पुरंदर तालुक्यात दिवाळीत डबल धमाका; पुरंदरला दोन आमदारांची संधी?
सौ. हर्षदा देशमुख जाधव आणि प्रा. नंदकुमार सागर यांनावं संधी मिळण्याची शक्यता
प्रतिनिधी
पुरंदर दि. २४ केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या पाच जागांची निवडणूक प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुबात होणार आहे. ६ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरणे, ७ ऑक्टोबर रोजी छाननी आणि ९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. मतदान २३ ऑक्टोबर रोजी होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
यात पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक आमदार मतदार संघ यांच्याही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. दिवाळीपूर्वी या निवडणुका होत असल्याने पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघातून पुरंदर तालुक्यातील दोन उमेदवार उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रपती पुरस्कार विजेते, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या जेजुरीतील जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर आणि पदवीधर मतदार संघासाठी पुरंदर चे सुपुत्र व पुण्यातील प्रख्यात उद्योजक व के.जेस एज्युकेशन इन्स्टिट्युट चे संस्थापक कल्याणराव जाधव यांच्या सनुषा हर्षदा देशमुख जाधव या उभ्या राहणार आहेत. सध्या त्या केजेस एज्युकेशन इन्स्टिट्युट च्या एम. डी. म्हणून कार्यरत आहेत. हे दोन्ही उमेदवार हे पुरंदर तालुक्यातील असल्याने दोघांनाही उमेदवारी मिळण्याची खात्री पुरंदरच्या राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत असून येत्या दिवाळीत डबल धमाका होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
इच्छुक दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने गेले वर्षभर आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीसाठी तयारीही केलेली आहे. प्राचार्य नंदकुमार सागर हे भाजपकडून शिक्षक मतदार संघासाठी इच्छुक आहेत तर हर्षदा देशमुख जाधव या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत. शिवाय प्रत्यक्ष मतदारापर्यंत दोघाही उमेदवारांनी दोन दोन फेऱ्या या अगोदरच पूर्ण केलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच अशी तयारी झालेली आहे.
दोन्ही उमेदवार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील असल्याने येत्या दिवाळीत पुरंदरला दोन आमदार मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने संपूर्ण तालुक्यात निवडवणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. शिक्षण विभाग आणि युवा कार्यकर्ते काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर कामाला ही लागले आहेत. आता फक्त पक्ष नेतृत्वाकडून संधी मिळणे बाकी राहिलेले आहे.
पुणे विभागातून होणाऱ्या या दोन्ही उमेदवारांना विजयाची खात्री आहे. पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छित असणाऱ्या हर्षदा देशमुख जाधव या सेवानिवृत्त सनदी अधिकारी पुण्याचे माजी जिल्हाधिकारी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. यामुळे पुणे आणि सातारा जिल्ह्यात त्यांच्या उमेदवारीला या दोन्ही जिल्ह्याचा मोठा पाठींबा आहे. शिवाय पुणे विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांना विजयाची मोठी संधी आहे.
शिक्षक मतदार संघासाठी इच्छुक असणारे प्रा. नंदकुमार सागर यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून पुणे विभागातील शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्याचं बरोबर संपूर्ण पुणे विभागात पुरंदर चे माजी आमदार, भाजपचे युवा नेते संजय जगताप यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गेले पाच वर्षांपासून स्वच्छ व सुंदर शाळा या स्पर्धा आयोजित करून विभागातील प्रत्येक शाळा महाविद्यालय आणि शिक्षकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. यामुळे या विभागातील शिक्षकांचा मोठा पाठींबा प्रा. सागर यांना असल्याने त्यांना ही विजयाची खात्री आहे. भाजप नेते संजय जगताप यांचे प्रा. सागर हे विश्वासू खंदे समर्थक असल्याने भाजपची मोठी रसद त्यांच्या मागे उभी राहणार आहे
या दोन्ही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळणार असल्याची तालुक्यातील राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातून मोठी चर्चा आहे. उमेदवारी मिळाली तर तालुक्याला अजून दोन आमदार मिळणार आहेत.




