अपघातपुणेपुरंदरसामाजिक

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात  अपघात तीन वारकरी महिला ठार तर आठ जण जखमी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली जखमींची भेट

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये

प्रतिनिधी
जेजुरी, दि. १३
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरी जवळील भोंगळे मळा येथे ट्रक वारकऱ्यांच्या दिंडीत घुसून धडक दिल्याने या अपघातात तीन महिला वारकरी ठार झाल्या तर इतर आठ जण जखमी झाले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात जाऊन जखमींच्या भेट घेऊन विचारपूस केली.
या अपघातात राजेश्री शंकर भोसले रा कसबे डिग्रज, माधवी राजाराम सरोदे, रा मालगाव मिरज, नंदा पवार कौलापुर सांगली या तीन महिला वारकरी ठार झाल्या तर गीताबाई शेलार, शैलजा दिनकर जगताप , मंगल विराज पाटील तिघी राहणार डिग्रज, आक्काताई बबन कोळी, रा शिरगाव, शांता शिवप्पा आलोककर रा मिरजगाव, कासूबाई गस्ते, रा. आष्टा, लक्ष्मी विठ्ठल गडदे रा कवठे महाकाल, शामराव चव्हाण रा परोची सांगली हे आठ जन जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की आज सकाळी सासवड वरून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जेजुरी कडे मार्गस्थ झाला. सकाळी सव्वा आठ च्या सुमारास जेजुरी जवळील भोंगळे मळा दरम्यान रोहा जि. नांदेड येथील वारकऱ्यांचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्र. एम. एच ४३ एफ. ४९०८ कसबे डिग्रज, सांगली येथील तात्यासाहेब वासकर महाराज यांच्या दिंडीत घुसला व यात अनेक महिला वारकऱ्यांना चिरडले.
अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालय दाखल केले.
अपघाताचे वृत् समजताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.

पालखी सोहळ्यात ही दुर्दैवी आणि वेदनादायक घटना घडली आहे. जखमी रुग्णावर चांगले उपचार करा आणि त्यांना आवश्यक ती मदत करा असे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच प्रत्येकी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमां नुसार चार लाख रुपयांची मदत करण्यात येईल, तसेच जखमींवर उपचार केले जातील असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
या घटनेचे वृत्त समजताच राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आळंदी देवस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ,भावार्थ देखणे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

या अपघातातील ट्रक चालक सुनील शंकर साळुंखे, वय ६५ राहणार सोलापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जेजुरी पोलिस प्रशासन व जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी मदत केली.
पालखी सोहळ्याचे योग्य नियोजन नसल्यानेच हा अपघात झाल्याची चर्चा वारकऱ्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page