पुणेपुरंदर

“प्रशासकराज संपलं की नाही?”झेडपी च्या प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या विकास कामांची श्वेत पत्रिका काढा

ज्योती-सावित्री शाळा उद्घाटन सोहळ्यावरून पुणे जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे….
प्रतिनिधी
पुरंदर, दि. २० खानवडी (ता. पुरंदर) येथे पार पडलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळे’च्या भव्य उद्घाटन सोहळ्यात पुणे जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गाजावाजा झाला; मात्र या झगमगाटामागे प्रशासनाच्या निष्काळजी, विस्कळीत आणि लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या कार्यपद्धतीचे वास्तव उघड झाल्याची तीव्र चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या सोहळ्यात मूलभूत नियोजनच कोलमडल्याचे चित्र समोर आले. शिव सेनेचे ( ठाकरे गट ) जिल्हा परिषद गटनेते विजय शिंदे पाटील यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनावर थेट हल्लाबोल करत, “प्रशासकराज अजूनही संपलेले नाही काय?,” असा रोखठोक सवाल उपस्थित केला.
१} पास नाही, प्रवेश नाही — लोकप्रतिनिधींची अवहेलना..
नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनाच पास न दिल्यामुळे पोलिसांकडून अडवण्यात आल्याच्या घटना घडल्या. “आमच्याकडे पास नाहीत, आम्ही आमचे काम करतो,” अशी पोलीस यंत्रणेची भूमिका; आणि दुसरीकडे जनतेचे प्रतिनिधी प्रवेशासाठी धडपड करताना दिसले.ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे द्योतक ठरली. काही ठिकाणी किरकोळ वादही झाले.
२} महिला सदस्यांना पायी चालण्याची वेळ — व्यवस्थापनाचा बोजवारा
सोहळ्याच्या नावाखाली महिला सदस्यांसह अनेकांना तब्बल २ किलोमीटर पायी चालत कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागले. कोट्यवधींचा खर्च करूनही मूलभूत सुविधा पुरवता न येणे, हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे जिवंत उदाहरण असल्याची टीका होत आहे.
३} मान्यवरांनाही अडवले — समन्वयाचा पूर्ण अभाव...
जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनाही काही काळ थांबवण्यात आल्याची घटना समोर आली. मोठ्या पदाधिकाऱ्यांनाही ओळख न मिळणे आणि योग्य समन्वयाचा अभाव हा प्रशासनाच्या गोंधळाचा परिपाक असल्याचे बोलले जात आहे.
४} व्यासपीठावर विसंगती — प्रोटोकॉलचा फज्जा...
व्यासपीठावरील आसनव्यवस्था आणि प्रोटोकॉलमध्ये गंभीर त्रुटी दिसून आल्या. कोणाला कुठे बसवायचे याचे भान नसल्यासारखे चित्र निर्माण झाले. यामुळे कार्यक्रमाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
५} ‘अजितदादांचा’ विसर की जाणूनबुजून दुर्लक्ष?
शाळांच्या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो व्यासपीठावर नसल्याने संताप व्यक्त झाला. हा केवळ विसर की जाणीवपूर्वक दुर्लक्ष, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
६} लोकप्रतिनिधींचा अपमान — जनतेचाही अपमान...
४० ते ५० हजार मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांना कार्यक्रमात सन्मान आणि सुविधा न मिळणे, हे केवळ व्यक्तींचा नव्हे तर त्यांच्या मतदारांचा अपमान असल्याची भावना व्यक्त झाली.“विकासकामे जनतेसाठी असतात, प्रशासनाच्या अहंकारासाठी नाहीत,” अशी टीका सभागृहात उमटली.
७} सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल….
गटनेते विजय शिंदे पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर कठोर शब्दांत टीका करत पुढील मागण्या केल्या:
१} प्रशासनावर श्वेतपत्रिका जाहीर करावी.
२} अँटीकरप्शन प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करावी.
३} जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
४} चार वर्षे प्रशासनाच्या हाती सत्ता असताना अशी ढिसाळ व्यवस्था का, असा थेट सवाल.
संतापाची लाट — जबाबदारी निश्चित करण्याची मागणी…
या सर्व प्रकारानंतर जिल्हा परिषद वर्तुळात तीव्र नाराजी पसरली आहे. कोट्यवधींच्या खर्चानंतरही साधे नियोजन करता न येणे, हा प्रशासनाचा अपयशाचा कळस असल्याची चर्चा आहे.
झगमगाटावर खर्च, पण समन्वय शून्य….
भव्य मंच, मोठे चेहरे आणि प्रचाराचा गाजावाजा यापलीकडे जाऊन प्रशासनाने प्रत्यक्ष कामकाज सुधारणे गरजेचे आहे. अन्यथा “प्रशासकराज” संपल्याचे केवळ दाखवले जाईल; पण प्रत्यक्षात ते अधिक बळकट होत असल्याचेच चित्र समोर येत राहील. अशी रोखठोक भूमिका गटनेते विजय शिंदे यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडल्याने सभागृहात गदारोळ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page