पुरंदर शिक्षक पतसंस्थेत नाट्यमय घडामोडी…. शिक्षक पतसंस्थेत उलटफेर, एका मताने जितेंद्र कुंजीर यांची चेअरमनपदी निवड ; तर व्हाईस चेअरमन पदी गणपत मेमाणे यांची बिनविरोध निवड
पुरंदर प्रतिनिधी
दि. २७
नाट्यमय घडामोडींमध्ये पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत जितेंद्र कुंजीर यांनी एका मताने विजय मिळवत चेअरमनपद पटकावले. तर व्हाईस चेअरमन पदी गणपत मेमाणे यांची निवड झाली. सत्ताधारी गटातील एक संचालकाने विरोधी मतदान केले.
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था आहे. या संस्थेत एकूण १५ संचालक असून विद्यमान चेअरमन गोरक्षनाथ चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली.
संस्थेच्या संचालक मंडळात सत्ताधारी पॅनलचे ९, तर विरोधी पॅनलचे ६ संचालक आहेत. चेअरमनपदासाठी सेवानिवृत शिक्षकांनी चंद्रकांत जगताप यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र सत्ताधारी गटातीलच दुसरे इच्छुक जितेंद्र कुंजीर यांनी ही आपला उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत जगताप यांना ७, तर जितेंद्र कुंजीर यांना ८ मते मिळाली.
निवडणुकीपूर्वी चंद्रकांत जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच ऐनवेळी समीकरणे फिरली आणि जितेंद्र कुंजीर यांनी बाजी मारत सर्वांना धक्का दिला.
या निकालामुळे सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व करणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप कुंजीर, राजेंद्र जगताप व राजेंद्र कुंजीर यांना धक्का बसल्याची चर्चा आहे.
मात्र, या नाट्यमय घडामोडींमुळे शिक्षक पतसंस्थेतील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून आले.
तसेच, व्हाईस चेअरमन दत्तात्रय फडतरे यांनी राजीनामा दिल्यामुळे या पदाचीही निवड यावेळी घेण्यात आली. मात्र, व्हाईस चेअरमन पदासाठी गणपत मेमाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.




