पुरंदर तालुक्यात ६८ टक्के मतदान
पुरंदर, दि. ८
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ७ ) शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळपासून मतदान एक सारखे चालू होते. सायंकाळी चार नंतर मात्र मतदानाचा वेग वाढला साडेपाचनंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशीरा तालुक्यात चारही जिल्हा परिषद गटांत सरासरी ६८.३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.
शनिवार सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २२ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी दीड वाजेपर्यंत ३८ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढत गेला.
तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. गराडे गणात १७,५५० मतदारांनी मतदान करत ७५.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. दिवे गणात १८,२८५ मतदारांनी मतदान केले असून येथे ७३.६६ टक्के मतदान झाले. बेलसर गणात १५,८६७ मतदान होऊन ७६.८९ टक्के मतदानाची उच्च नोंद झाली. माळशिरस गणात १५,६४४ मतदान झाले असून ६९.७४ टक्के, वीर गणात १५,७९६ मतदान होऊन ६६.१४ टक्के, भिवडी गणात १६,५४३ मतदान होऊन ६५.९६ टक्के, निरा गणात १४,४३६ मतदान होऊन ६२.७१ टक्के, तर कोळविहिरे गणात १५,२८४ मतदान होऊन ६४.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच पुरंदर तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचे चित्र दिसून आले.
मतदानानंतर उमेदवार आपापल्या विजयाची खात्रीव व्यक्त करीत आहेत. तर कार्यकर्त्यात गावनिहाय मतदानाची माहिती घेऊन आपणच कसे निवडून येऊ हे पटवून देताना दिसत आहेत. मतदारांनी कोणाला कौल दिला हे उद्या दि. ९ रोजी समजणार आहे.




