पुरंदरशिक्षणसहकार

पुरंदर शिक्षक पतसंस्थेतील सत्तासंघर्ष उफाळला! बैठकीतील वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत; अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी
पुरंदर दि. ६
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. या वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत.
सासवड येथील शंकरराव उरसळ सभागृहात झालेल्या बैठकीदरम्यान, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतरे यांनी पतसंस्थेच्या निवडणुकीचा राग मनात ठेवून थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप उपसभापती गणपत मेमाणे यांनी केला आहे.
या प्रकरणी मेमाणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, यापूर्वीही राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे हा वाद केवळ बैठकीपुरता मर्यादित नसून, पतसंस्थेच्या चेअरमन निवडीदरम्यान निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या मतभेदांमधूनच या संघर्षाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
चेअरमनपदी जितेंद्र कुंजीर यांची झालेली चुरशीची निवड आणि एका मताभोवती फिरणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे वातावरण आधीपासूनच तापले होते.
विशेष म्हणजे, “हे मत नेमके कुणाचे?” या प्रश्नावरून संशयाची सुई काही सत्ताधारी संचालकांकडे वळल्याने गटबाजी अधिकच तीव्र झाली आहे.
चौकट –
पूर्वी शिक्षक समितीत आरडाओरड आणि वाद निर्माण करणारे तानाजी फडतरे यांनी शिक्षक संघात मागच्या दाराने प्रवेश केल्याची चर्चा जोर धरत आहे.
“संघाचे आजीव सभासद नसतानाही ते थेट अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे,अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ केवळ दीड वर्षांचा निश्चित असताना देखील त्यांनी तब्बल तीन वर्षे हे पद भूषवले आहे.त्यामुळे ही बाब सरळसरळ बेकायदेशीर असल्याचा ठाम आरोप जितेंद्र कुंजीर व गणपत मेमाणे यांनी केला आहे.”
या पार्श्वभूमीवर राजीनाम्याची मागणी, दबावाचे आरोप, अंतर्गत संघर्ष, संघटना नेतृत्वावरील अविश्वास आणि विरोधकांकडून मिळालेली मदत यामुळे संघटनांतील तणाव आणखी तीव्र होत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page