पुरंदरशिक्षणसहकार

पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेत घडामोडी; जितेंद्र कुंजीर यांची हकालपट्टी

प्रतिनिधी
पुरंदर, दि. २९

पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेतील अलीकडील घडामोडींमुळे शिक्षक संघटनांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. पतसंस्थेच्या संचालक मंडळात शिक्षक संघाचे ९, तर समितीचे ६ संचालक आहेत.
संघाच्या संचालकांच्या टप्प्याटप्प्याने दोन जागा रिक्त झाल्यानंतर, शिक्षक संघाच्या वतीने जितेंद्र कुंजीर व गणपत मेमाणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उर्वरित सर्व संचालक लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत.
दरम्यान, सभापती पद रिक्त झाल्याने शिक्षक संघाने सर्व सभासदांची बैठक घेऊन सभापतीपदासाठी चंद्रकांत जगताप, तर उपसभापतीपदासाठी गणपत मेमाणे यांची नावे अधिकृतरित्या निश्चित केली होती. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान जितेंद्र कुंजीर यांनी समिती सदस्यांच्या सूचक व अनुमोदकाच्या मदतीने सभापतीपद मिळवले. या निवडीत शिक्षक संघाच्या अधिकृत उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची तातडीची बैठक घेण्यात आली. संघटनेविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत जितेंद्र कुंजीर यांची शिक्षक संघातून रीतसर हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. हा निर्णय कार्यकारी मंडळाच्या संमतीने घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
तसेच, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते राजेंद्र जगताप यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघटना ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असल्याने संघटनेचे निर्णय सर्व संबंधितांसाठी बंधनकारक आहेत. त्यानुसार, केंद्रप्रमुख संघटना व शिक्षक संघ या दोन्ही स्तरांवरून जितेंद्र कुंजीर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page