पराभवानंतर वाद चिघळला; शिक्षक पतसंस्थेतील घडामोडींनी खळबळ मतभेद जरूर ठेवा.. शिक्षकीपेशा बदनाम करू नका
संपादकीय
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदाची नुकतीच निवडणूक पार पडली. निवडणुकीत शिक्षक संघ आणि शिक्षक समिती असे शिक्षकांचे दोन संघटना एकमेकांसमोर होत्या. शिक्षक पतसंस्थेत शिक्षक संघांचे ९ तर शिक्षक समितीचे ७ संचालक आहेत. यामुळे चेअरमन, व्हाईस चेअरमन ही दोन्ही पदे शिक्षक संघाचीच होणार हे निर्विवाद होते. शिक्षक संघटनेने या दोन्ही पदासाठी संघटनेच्या दोघांची नावे ही सर्वानुमते ठरवलेली होती. मात्र संघटनेच्या विरोधात जाऊन स्वतः उमेदवारी अर्ज भरला. आणि समितीच्या सात जणांची मदत घेत चेअरमन पद मिळवले. साहजिकच संघटनेच्या विरोधी भूमिका घेतल्याबद्दल नव निर्वाचित चेअरमन जितेंद्र कुंजीर यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. यामुळे शिक्षक संघात दोन गट पडले असल्याचे निदर्शनास आले. संघटनेत या निवडणुकीनंतर सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळत असून, हकालपट्टीच्या निर्णयावरून शिक्षक संघटनांमध्ये तीव्र मतभेद समोर आले आहेत. या प्रकरणामुळे केवळ संघटनात्मक कार्यपद्धतीवरच नव्हे, तर शिक्षकांच्या सामाजिक आदर्श भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवडणुकीपूर्वी शिक्षक संघाने अधिकृत उमेदवार निश्चित केला होता. मात्र, प्रत्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान वेगळीच राजकीय घडामोड घडत जितेंद्र कुंजीर यांनी सभापतीपद मिळवले. या निवडीत अधिकृत उमेदवाराचा अल्प फरकाने पराभव झाला. त्यानंतर संघटनेने तातडीची बैठक घेऊन कुंजीर यांनी संघटनाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.
दरम्यान, कुंजीर यांनी ही कारवाई बेकायदेशीर व वैयक्तिक द्वेषातून प्रेरित असल्याचा आरोप केला.तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई नियमानुसार व कार्यकारी मंडळाच्या संमतीने झाल्याचा दावा केला केला.
मात्र,या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, गटबाजी, गावकी-भावकी आणि नेतृत्वातील मतभेद स्पष्टपणे पुढे आले. तसेच,संघटनांमध्ये दीर्घकाळ एकाच व्यक्तीकडे पद राहणे,काही पदे रिक्त ठेवली जाणे आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवरही चर्चा रंगत आहे.सेवानिवृत्त शिक्षकांचे संघटनांवरील वाढते वर्चस्व हाही चर्चेचा विषय ठरत आहे.
या वादात सर्वसामान्य कार्यकर्ते व सभासद बाजूला पडल्याचे चित्र दिसत असून, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.संघटनांतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम तळागाळातील सदस्यांवर होत असल्याने नाराजी वाढत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक घटक मानला जातो. ग्रामीण भागात तर शिक्षकांचे स्थान अधिक प्रभावी असते. अशा परिस्थितीत, शिक्षक संघटनांमध्येच गटबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि सत्तासंघर्ष दिसू लागल्यास समाजाने कोणता आदर्श घ्यावा, असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, हा वाद नेमका संघटनात्मक आहे की वैयक्तिक स्वार्थांचा, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, संबंधितांनी संयम राखून संवादातून तोडगा काढावा, तसेच संघटनात्मक प्रक्रिया अधिक पारदर्शक व लोकशाही पद्धतीने राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिक्षक संघ हा राज्यातील शिक्षकांची मोठीं संघटना आहे. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे संघटनेची जबाबदार पदे रिक्त राहत आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन दोन पदे, संघटने अंतर्गत विविध संघटना, सेवानिवृतीनंतर ही संघटनेच्या पदांची लालसा यामुळे केवळ शिक्षक संघ बदनाम होतो असे नाही तर शिक्षक ही बदनाम होऊ लागला आहे.




