धार्मिकपुरंदरसामाजिक

यात्रा-जत्रांच्या काळात शेजारच्या गावच्या पोलिस पाटलांनीही मदतीला धावावे : राजेंद्रसिंह गौर

प्रतिनिधी
पुरंदर , दि. १२
पुढील काही महिन्यांत ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात गावोगावी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केवळ त्या गावच्या पोलिस पाटलांवर न राहता शेजारच्या गावातील पोलिस पाटलांनीही मदतीला पुढे यावे, अशा सूचना भोर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी दिल्या.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांच्या पोलिस पाटलांची दप्तर तपासणी मंगळवारी गौर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जेजुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे तसेच विविध गावांचे पोलिस पाटील उपस्थित होते.
या बैठकीत गौर यांनी प्रत्येक पोलिस पाटलाच्या गावातील कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी काळात गावांमध्ये होणारे कार्यक्रम, यात्रा-जत्रा आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यात्रा-जत्रांच्या काळात शेजारच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे संबंधित गावच्या पोलिस पाटलांनी आपली जबाबदारी पार पाडावीच; मात्र शेजारच्या गावचे पोलिस पाटीलही त्या ठिकाणी जाऊन मदत करावी. पोलिस प्रशासनाच्या सूचनेची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असेही गौर यांनी स्पष्ट केले.
यात्रा-जत्रा शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी स्थानिक यात्रा समितीशी समन्वय साधावा. तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक आढळल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी आणि आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहनही त्यांनी पोलिस पाटलांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page