जेजुरीकरांनी भाजपला नाकारले, भाजप संस्कृती जेजुरीकरांच्या पचणी न पडणारी
बी. एम. काळे
जेजुरी, दि. २२ काल दि. २१ डिसेंबर रोजी जेजुरी नगरपालिका सार्वजनिक निवडणूकीचा निकाल लागला. निकालात भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. यावरून हेच स्पष्ट होते की जेजुरीत भाजपची डाळ शिजने अशक्य आहे. एकेकाळी संजय जगताप यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे जेजुरीकर या निवडणुकीत त्यांच्या विरोधात गेलेच कसे. याचे साधे आणि सोपे उत्तर जेजुरीकरांना माजी आमदार संजय जगताप यांचा भाजप प्रवेश अजिबात मान्य नाही. अठरा पगड जाती जमातीचे हे गाव भाजप संस्कृतीला अजिबात स्वीकारणार नाहीत. निवडणूकीपूर्वीची स्थिती तीच वस्तुस्थिती या निवडणुकीत दिसून आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल २० पैकी १७ जागांवर विजय मिळाला. शिवाय राष्ट्रवादी चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई भाजप चे सचिन सोनवणे यांच्यापेक्षा दुप्पट मतांनी विजयी झाले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस ने निवडणूकीपूर्वीच सर्व पक्षीयांची व्यवस्थित मोट बांधल्याचे ही स्पष्ट झाले. अजित पवार गटाकडून दोन पावले माघे सरून शरद पवार गटाचे निष्ठावंत नेते माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे मन वळवीत त्यांचे चिरंजीव जयदीप बारभाई यांना अजित पवार गटात प्रवेश देत उमेदवारी ही देऊ केली. इथेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले. यात काँग्रेस, उबाठा शिवसेना गट व इतर पक्ष संघटनांची जुळवनी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना यश आले.
सर्वपक्षीय मोट बांधून संजय जगताप यांचेच मागील सहकारी सोबत घेत त्यांना उमेदवाऱ्या ही देऊ केल्या. तोपर्यंत भाजप कडून कोणतीच हालचाल दिसत नव्हती. पक्ष नेतृत्व ठरवीन त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवार जाहीर करता आले नाहीत. यात काँग्रेसला रामराम करून भाजप मध्ये गेलेले माजी आमदार संजय जगताप यांची मोठी कोंडी आणि कसरत दिसून आली. पक्षाकडून जबाबदारी दिली असली तरी उमेदवार निवडीचे अधिकार मात्र दिले नसल्याने भाजप ला उमेदवार मिळवणे ही कठीण बनून बसले होते. एकीकडे पक्षात प्रवेश केला असला तरी पक्षाची संस्कृती नेमकी कशी आहे याची जान नसल्याने त्यांना भाजप ची लढाई यशस्वी करता येऊ शकली नाही.
भाजप ला अवघ्या दोन जागा मिळवता आल्या असल्यातरी त्या दोन्ही जागा त्या उमेदवारांच्या स्वतः च्या प्रतिमेवर मिळवता आल्या आहेत. चिन्ह जरी कमळाचे असले तरी ही.
गेल्या वर्षी पुरंदर विधानसभा निवडणूक पार पडली. विधानसभेला तत्कालीन काँग्रेस चे उमेदवार व आजचे भाजप नेते संजय जगताप यांना विधानसभेला जेजुरीकरांनी सर्वात जास्त मतदान केले होते. तेवढे ही मतदान या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढून ही मिळवता आलेली नाहीत. याचाच अर्थ संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशाला ही जेजुरीतील मतदारांनी नाकारलेले दिसत आहे..
जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या विजयाचा महत्वाचा टर्निंग पॉईंट जर कोणता असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा. सभेला मिळालेला प्रतिसाद आणि अजित पवारांचे खंडोबाच्या साक्षीने जेजुरीच्या विकासाचे दिलेले आश्वासन. सत्ता द्या, खंडोबाच्या साक्षीने जेजुरीच्या विकासाचा शब्द देतो. या विधानावर जेजुरीकरांनी ठेवलेला विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड यश देऊन गेला.
त्याच बरोबर विध्यमान आमदार विजय शिवतारे यांनी जेजुरी च्या निवडणूकीकडे गांभीर्याने अजिबात पाहिले नाही. स्थानिक पातळीवरून केवळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि तीन नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. लोकप्रतिनिधी असून ही पॅनल का नाही याचीही चर्चा होतं होती. या सर्व घडामोडी पाहता. जेजुरीतून भाजप ला हद्दपार कारण्याचा हा डाव होता. त्यात ते यशस्वी ही झाले. मात्र एक खरे यापूर्वी भाजप चा साधा नगरसेवक ही पालिकेत नव्हता. या निवडणूकीने दोन सदस्य लाभले एवढच काय ते भाजपचे यश म्हणावे लागेल.
तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने जेजुरीचे संपूर्ण अर्थकारण जेजुरी गडावर अवलंबून आहे. त्या जेजुरी गडाचे व्यवस्थापन पाहणारे विश्वस्त मंडळ संपूर्ण भाजप विचाराचे असताना ही त्याचा फायदा भाजप ला मिळाला नाही.
या सर्व कारनांचा विचार करता भाजप ला जेजुरीत पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अन्यथा बहुजनांची ही जेजुरी इथे भाजप संस्कृतीला अजिबात थारा देणार नाही. हेच खरे.
