भेसळ युक्त भंडारा विक्री विरुद्ध प्रशासनव ऍक्शन मोडवर, भंडारा पुरवठा करणारा टेम्पो ताब्यात

प्रतिनिधी
जेजुरी,दि.२५ भेसळयुक्त भंडारा विक्री बाबत अन्न व औषध भेसळ प्रशासन एक्शन मोडवर आले असून या प्रशासनाचे वर्षा बारवकर, रजिया शेख , लक्ष्मीकांत सावळे , डॉ.संदीप शिंदे आदी अधिकारी -कर्मचारी यांनी सोमवारी (दि.२२) जेजुरीत दाखल होत मुख्य महाद्वार व शहरातील विक्रेत्यांकडील भंडाऱ्याची तपासणी करीत काही नमुने ताब्यात घेतले. यावेळी बेळगाव येथून विक्रेत्यांना भंडारा पुरवठा करणारा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे ,कर्मचारी अण्णासाहेब देशमुख व पोलीस पथक या कारवाई मध्ये सहभागी झाले होते.ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रविवारी (दि.२१) नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर भंडारा अर्पण करून नतमस्तक होण्यासाठी गेले होते यावेळी पहिल्या पायरीच्या वेशीवरून काही उत्साही कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली या उधळणीतून अचानक भंडाऱ्याचा मोठा भडका उडाला होता .या घटनेत दोन नवनिर्वाचित नगरसेविकासह सुमारे १६जण होरपळले होते.त्यांच्यावर सरकारी ,तसेच जेजुरी व पुणे येथे उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे तर काही जणांना घरी सोडण्यात आले आहे.
याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी ही या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरजव असून योग्य त्या कारवाईची मागणी केली होती.
मागील काही वर्षांपासून ग्रामस्थ खांदेकरी मानकरी यांच्याकडून भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत सतत तक्रारी करण्यात येत आहेत. जत्रा ,यात्रा उत्सव नियोजन बैठकीत प्राधान्याने भेसळयुक्त भंडारा विक्री रोखणे बाबत आवाहन करण्यात येत आहे तर सन.२०२१-२२ दरम्यान मागील काळातील विश्वस्त मंडळाने अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे औन्ध (पुणे )येथील कार्यालयात निवेदन देत आवाहन केले होते. तर आठ महिन्यांपूर्वी माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे ,पत्रकार प्रकाश फाळके यांनी अन्न व औषध भेसळ प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची मुंबई येथे भेट घेत भेसळयुक्त भंडारा विक्रीवर आपले विभागाकडून प्रतिबंध घालण्यात यावा उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती . त्यावेळी मोठी खळबळ होऊनही अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नव्हती .

याबाबत जेजुरी शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी, घडलेली घटना ही अत्यन्त दुर्दैवी आहे .घटनेत जखमी झालेले सर्वजण सुरक्षित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार करून काहीजणांना घरी सोडण्यात आले आहे .घडलेल्या घटनेबाबत व जखमींची विचारपूस करत माहिती घेण्यासाठी वरिष्ठनेते , शासन ,प्रशासन व्यवस्थेकडून दक्षता घेण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत पूढील काळात नगरपालिका आणि प्रशासन व्यवस्थेकडून केमिकल व भेसळयुक्त भंडारा विक्रीवर तसेच उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहे.

घडलेल्या घटनेतुन बोध घेण्याची गरज.
खंडेरायाच्या जेजुरी नगरीत वर्षातून आठ ते दहा मोठ्या यात्रा होतात. लाखो भावोकांची उपस्थिती गडकोट पायरीमार्गावर असते.यावेळी दिवटी पेटवणे , भंडारा उधळण मोठ्या प्रमाणावर होते. यावेळी अशी दुर्घटना घडल्यास मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते , मांढरदेवीची दुर्दैवी घटना पाहता जेजुरीमध्ये भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.त्याहून म्हणजे केमिकल ,भेसळयुक्त भंडारा हद्दपार होणे गरजेचे आहे.

प्रसाद विक्री पेढे ही तपासने गरजेचे
जेजुरीत भंडार खोबऱ्याला अन्नन्य साधारण महत्व आहे. भंडार खोबरी उधळल्यानंतर त्यातील खोबरे प्रसाद म्हणून खाल्ले जाते. मात्र सद्या जेजुरीत गडाच्या पहिल्या पायरीपासून पेढा विक्रीवाल्यांची मोठीं गर्दी झालेली आहे. अन्न व भेसळ प्रशासनाने या पेढे वाल्यांची ही चौकशी करणे, पेढे तपासाने गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page