पर्यटनपुरंदरमुंबईसामाजिक

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी फुलले ‘मिनी कास पठार’, पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी
पुरंदर दि. ७ पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक वारशाबरोबरच निसर्गाचेही मोठे वरदान लाभले आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आणि चिव्हेवाडी घाटाच्या सुरुवातीला सध्या विविध रंगांच्या रानफुलांनी फुलांचे नंदनवनच फुलले असून, या परिसराला जणू ‘मिनी कास पठाराचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याची दुलई आणि त्यामध्ये उमललेली गुलाबी-जांभळी फुले यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
पावसाळ्यामुळे पुरंदरच्या डोंगररांगांनी हिरवा शालू नेसला असून, चिव्हेवाडी घाटाच्या परिसरातील माळरानावर मोठ्या प्रमाणात रानफुलांची उधळण पाहायला मिळत आहे. दूरवर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यामुळे संपूर्ण परिसर एखाद्या रंगीबेरंगी फुलांच्या गालिच्यासारखा दिसत आहे.
या मनमोहक निसर्गसौंदर्यामुळे या परिसराला भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पुरंदर किल्ला, नारायणपूर तसेच ‘प्रतिबालाजी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या केतकाळे येथे भाविक व पर्यटक भेट देण्यासाठी येत असताना, या भागातील निसर्गसौंदर्य त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फुलांच्या सान्निध्यात छायाचित्रे काढण्याचा आणि निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.
विशेष म्हणजे, ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या सान्निध्यात फुललेले हे निसर्गवैभव पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण ठरत आहे. किल्ल्याचा इतिहास आणि पावसाळ्यात खुलून आलेले निसर्गसौंदर्य यामुळे पुरंदर परिसराच्या पर्यटनाला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.
पुरंदरच्या पर्यटनाला नवी ओळख
पुरंदर किल्ला, वज्रगड, नारायणपूर परिसर आणि विविध घाट-वाटांमुळे पुरंदर तालुका पूर्वीपासूनच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यातच चिव्हेवाडी घाटाच्या सुरुवातीला फुललेले हे रानफुलांचे सौंदर्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणाचा ‘मिनी कास पठार’ म्हणून पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page