पुरंदरमहाराष्ट्रमुंबईराजकारणशिक्षण

राज्यात म. फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्र उभारणार.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी

पुरंदर दि. १२ महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी महोत्सव आजपासून सुरु करीत असून वर्षभरात राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे एक कार्य म्हणून केंद्र शासनाचा म. ज्योतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे राज्यात शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या उपक्रमांतर्गत राज्यात एक हजार प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खानवडी ता. पुरंदर येथे केली.
खानवडी ता. पुरंदर येथे म. ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी फुलेंच्या दोनशेव्या जन्म शताब्धीचे औचित्य साधत ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या भव्य इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडसणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, दादा भुसे, मंगलप्रभात लोढा,अतुल सावे,आदीती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार बापू
पठारे, राहुल कुल, शंकर मांडेकर, योगेश टिळेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, प्रांतधिकारी वर्षा लांडगे, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ खानवडीच्या प्रशासक स्वप्नाली होले यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी सदस्य, पुरंदर पंचायत समिती पदाधिकारी अधिकारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रथम येथील महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकामध्ये फुले दांपत्याच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यानंतर शाळा उद्घाटन, शाळेतील तेलचित्राचे अनावरण,मुलींना सायकल वाटप, जिल्हा परिषद शाळेतील विविध उपक्रमांच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या दालनांची पाहणी,शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी उपस्थित मान्यवरांना संबोधित केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘ म. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खुद्ध महात्मा गांधीजीनी दिली आहे. त्याचे कारण ही तेवढेच महत्वाचे आहे. म. फुलेनी आधुनिक शेती, उत्पादित शेतमालाला बाजारपेठ, स्वतः उद्योजक असल्यामुळे यशस्वी होणारी उद्योग मूल्ये, यातून नगरविकास रचनेची संकल्पना. एवढेच नाही तर शेतकरी जागृती, महिला सबलीकरनासाठी मुलींना शिक्षण आणि मुलींची पाहीली शाळा त्यांनीच सुरु केली. याकामी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुलेनी साथ दिली. पुढे सत्यशोधक चळवलीच्या माध्यमातून पुरोगामी समाजाची निर्मिती करण्याचे महत्कार्य त्यांनी उभे केले. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सी बी एस सी बोर्ड असणारी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देणारी ही राज्यतली पहिली शाळा आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या शाळेत सद्या २६० विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. भविष्यात २८० विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आणि सुमारे १८४० विध्यार्थ्यांची मोफत शिक्षणाची सोय होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी. शाळेच्या उभारणीची संकल्पना ही स्व अजितदादा पवार यांची होती. त्यांनी स्वतः शाळेचे भूमिपूजन केले होते. म. फुलेंच्या जन्मगावी ही शाळा व्हावी असा त्यांचा आग्रह होता. आज तो पूर्ण होतं आहे. शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या या फुले दाम्पत्यांना केंद्रशासनाचा भारत रत्न पुरस्कार मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
या शाळेच्या माध्यमातून आणि फुलेंच्या जन्म शताब्धी वर्षाचा सुभारंभ खानवडी येथून झाल्याने हे ठिकाण सामाजिक परिवर्तनचे केंद्र झाल्याचे सांगत यापुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आरक्षण मिळवून देणे हीच खरी या उभयतांना श्रद्धांजली ठरणार आहे असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
खानवडी हे महात्मा फुले यांचे जन्मस्थळ समृध्द असावे या विचारातून व येथे उपलब्ध असणारी त्यांच्या घराची चौकट पाहता येथे ग्रामविकास विभागाच्या वतीने १० ते १२ कोटी रुपये खर्च करून त्यांच्या घराची प्रतिकृती उभारण्याचा संकल्प ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले तर आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page