नाझरे जलाशय कोरडे, ५५ गावांना टँकर ने पाणी पुरवठा
बी. एम. काळे
दि.३० पुरंदर तालुक्यातील पूर्व पुरंदर आणि पश्चिम बारामतीतील परिसराची तहान भागवणारे जेजुरी जवळचे नाझरे जलाशय आज कोरडे ठणठणीत झाले असून या भागातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी सण २००३ ते २००५ याकाळात सलग तीन वर्षे नाझरे जलाशय कोरडे ठणठनीत पडले होते. तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी केंद्रीय लवाजम्यासह नाझरे जलाशयात हेलिकॉप्टर उतरवून पाहणी केली होती. त्यानंतर यावर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शासकीय पातळीवरून उपाययोजना राबवणे गरजेचे बनले आहे. पूर्व पुरंदर तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुरंदर तालुक्यातील पाणी टंचाईची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. तालुक्यातील वीर जलाशय परिसर वगळता सर्वच जलाशय कोरडे पडले आहेत. अजून दोन महिने जायचे असून दिवसेंदिवस परिस्थिती अजुनही गंभीर होणार आहे. केवळ पाणी टंचाईचाच गंभीर प्रश्न नाही शेतकरी वर्गाला जाणवरांची चिंता ही मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.
गेल्या बर्षी पावसाने संपूर्ण पुरंदर तालुक्याला हुलकावणी दिल्याने संपूर्ण तालुका सद्या दुष्काळाचे चटके सहन करीत आहे. सहा महिन्यापूर्वी पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर करूनही शासनाने हव्या तशा उपाययोजना न राबवल्याने दुष्काळग्रस्त संताप व्यक्त करीत आहेत.
शासकीय पातळीवरून पुरंदर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पुरंदर तहसील कार्यालयातून ई व्ही एम मशीन चोरी प्रकरणाने पुरंदरचे तहसीलदार, प्रांत, आणि विभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने प्रशासनाकडून दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यास अडचणी निर्माण झाल्या. याच काळात लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहिता यात सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांनी स्थलांतर केले. किंवा आपले पशुधनाची विक्री केली किंवा नातेवाईकांकडे पाठवली आहेत. आज ही अशीच परिस्थिती आहे. काही सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी ळ, सामाजिक कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर, आणि जाणवरांचा चारा, चारा छावनी यातून सर्व सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र शासकीय पातळीवरून उपाययोजना अजून तरी दिसत नाहीत. आता पावसाळा सुरु होत आहे. मात्र पाणी टंचाई अजून ही दीड ते दोन महिने भासणार आहेच.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात कारण्यासाठी केवळ पिण्याच्या पाण्याची उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. यात तालुक्यातील सुमारे ५० गावे आणि ३५७ वाड्यावस्त्यांना टँकर ने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सुमारे १ लाख ७७३७ लोकसंख्या पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. याशिवाय लहान मोठीं ७५ हजार ५७६ पशुधन चारा. आणि पाण्यासाठी तिष्ठत आहेत. पुरंदर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या वस्त्यांना शासकीय आणि खासगी ७९ टँकरने २८१ ट्रीप द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील जलस्रोत ही कोरडे पडल्याने टंचाई ग्रस्त भागात नियमित आणि अपेक्षित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी ही वाढू लागल्या आहेत. तालुक्यात केवळ वीर जलाशय आणि त्याखालील मांडकी परिसरात जल स्रोत उपलब्ध असून या ठिकाणावरून टँकर भरावे लागत आहेत. प्रशासनाने तालुक्यात काही ठिकाणी टँकर भरण्याच्या जेथे जेथे सुविधा निदर्शनास येतील त्या त्या ठिकाणावरून टँकर भरण्याच्या सुविधा निर्माण करणे आवश्यक बनले आहे.
हाताला रोजगार, जनावरांना चारा शासनाकडून मिळाला नाहीच. मात्र, किमान पिण्याचे पाणी तरी नियमिय आणि अपेक्षित मिळावे अशी मागाणी सर्व सामान्यांकडून होत आहे.