शासन जेष्ठ नागरिकांबाबत उदासीन – – खासदार सुप्रिया सुळे
शासन जेष्ठ नागरिकांबाबत उदासीन – – खासदार सुप्रिया सुळे
जेजुरी, दि. ११ लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासातील सवलती काढून घेतल्या . अद्याप पर्यंत या सवलती देण्यात सरकारला अपयश आले आहे. जेष्ठ नागरिकांबाबत केंद्र आणि राज्यशासन उदासीन आहे. याउलट सत्तेसाठी सर्वसामान्यांचा विश्वासघात होत आहे. या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्टाचारा विरोधात विश्वासघाता विरोधात आपली नैतिकतेची लढाई आहे असे प्रतिपादन जेजुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
जेजुरी येथील जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गरजू शंभर महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल जेजुरी जिजामाता विद्यालयाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांत जीवन विद्या मिशनच्या विद्यूलता केदार यांचे व्याख्यान झाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलताना पुढे म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिक रेल्वे सवलती बाबत वंचित आहेत,केंद्र शासन रेल्वे तोट्यात आहे असे सांगते मात्र बुलेट ट्रेन,वंदे भारत ट्रेन वर प्रचंड खर्च करीत आहेत,काही भागात वंदे भारत रेल्वेत केवळ ४० ते ५० प्रवाशी असतात.या रेल्वे पेक्षा गरीब रथ महत्वाची आहे. सरकारने उद्योजकांचे दहा लाख कोटी रुपये कर्ज माफ केले.सर्व सामान्य जनतेचे काय? हे सरकार गरीब, शेतकरी,महिला व ज्येष्ठांच्या विरोधात आहे. तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडा हा सुमारे ३५० कोटीचा आहे हा विकास आराखडा महाविकास आघाडीने मंजूर केला मात्र श्रेय दुसरे घेत आहेत. पोलीस भरती बाबत शासनाने सात हजार मुलांना नियुक्तीची पत्रे दिली.आणि नंतर त्यांना वेटींग ची पत्रे आहेत,चुकून झाले असे सांगून सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक केली असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला.
यावेळी आमदार संजय जगताप म्हणाले की,’ स्वराज्य निर्मितीचे स्वप्न राजमाता जिजामाता यांनी केले.अहिल्यादेवींनी देशातील साडे तीन हजार मंदिरांचा जीर्णोद्धार केला.राणी लक्ष्मीबाई,इंदिरा गांधी,मदर तेरेसा,कल्पना चावला,सावित्रीबाई फुले,अनेक महिलांनी देशासाठी काम केले .खासदार सुप्रिया सुळे ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत.जागतिक दिनानिमित्त देशातील सर्वच कर्तृत्ववान महिलांचा आदर केला पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम आप्पा इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकध्यक्ष माणिक झेंडे पाटील, उपाध्यक्ष पुष्कराज जाधव, जयदीप बारभाई, प्राचार्य नंदकुमार सागर, फेस्कॉम्मचे राज्याचे माजी अध्यक्ष अरुण रोडे, फेस्कोमचे हनुमंत कुंभार,डॉ मिलिंद सरदार,महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक फेस्कोम ग्रामीणचे अध्यक्ष शामकाका पेशवे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शाम काका पेशवे यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग कोरपड, सुहास बारभाई,तर आभार हरीचंद्र कराळे यांनी मानले.