दोन मंडल, एक शिबीर? शिवरी येथील महाराजस्व अभियान शिबीर कोणाच्या सोयीसाठी, अधिकारी की जनता?
जेजुरी, दि. १२ शासनाच्या महसूल विभागाकडून महाराजस्व अभियान अंतर्गत शिवरी आणि वाल्हे या दोन मंडलासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर येत्या शनिवारी (दि. १४) रोजी शिवरी येथील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात आयोजित केले आहे. सर्वसामान्यांना या शिबिरात न्याय मिळवण्यासाठी तब्बल २० किलोमीटर वरून येथे यावे लागणार आहे. यात ज्यांच्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यांचीच मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे हे शिबीर नेमके कोणाच्या सोयीसाठी राबवले जात आहे असा प्रश्न सर्वसामान्यांनातून विचारला जात आहे.
शासनाकडून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, नोकरदार, मजूर यांच्यासाठी प्रत्यक्षव शासन आपल्या दारी येऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात सात बारा दुरुस्त्या, व सातबारा वाटप, जमिनीचे वर्गीकरण, भुसंपादन, विविध दाखले, त्यांचे वाटप, सामाजिक लाभाच्या विविध शासकीय योजना, एक खिडकी योजना अंतर्गत येणारी विविध दाखले आणि तक्रार निवारण आदी समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासन कोट्यावधी रुपये खर्च करून ही शिबीरे प्रत्येकव मंडळात राबवत आहे. त्यात्या मंडळाच्या मंडळधिकाऱ्यांवर याबाबत जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुरंदर महसूल विभागाकडून प्रत्येक मंडलानुसार शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. यात वाघापूर, नारायणपूर, परिंचे, शिवरी,सासवड आणि जेजुरी असे शिबिराचे नियोजन आहे. यात शिवरी येथे घेण्यात आलेल्या शिबिरात शिवरी आणि वाल्हे ही दोन मंडल एकत्र घेण्यात आली आहेत. यामुळे अगदी नीरा मांडकी, जेऊर गुळुंचे आदी १५ ते वीस किलोमीटर वरून सर्वसामान्यांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येथे यावे लागणार आहे.
शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पोलीस, पशुधन, पाटबंधारे, सहकार, वीज वितरण, परिवहन, महिला व बालविकास आदी विभागातील समस्यांचे जागेवरच निराकारण करण्यात येणार आहे.
मोठी प्रसिद्धी करीत या शिबिराचे आयोजन महसूल विभागाकडून केले जाते. तालुक्यात सहा ठिकाणी होतं असलेल्या शिबिरापैकी शिवरी येथील हे शिबीर सर्वसामान्यांच्या गैरसोयीचे असल्याची चर्चा आहे. शिवरी येथील विद्यालयात घेण्यात येणाऱ्या शिबिराला विद्यालयाचे सभागृह अत्यंत छोटे आहे. त्या सभागृहात दोन मंडळाचे हे शिबीर शक्यच नसल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. अपुऱ्या जागेत घेण्यात येणाऱ्या या शिबिरात सर्वसामान्यांना न्याय मिळणार का? सुमारे ११ विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणारे विविध टेबल यांना ही जागा योग्य नसताना ही या ठिकाणी शिबीर आयोजित केले आहे. अपुऱ्या जागेत हे शिबीर घेण्यामागचा उद्देश काय? एक तर दूरवरून यायचे आणि वेळ न पुरल्यामुळे रिकाम्या हाताने माघारी जायचे यातून सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणार आहे.
दोन दोन मंडलातील समस्या एकाच ठिकाणी कशा सोडवल्या जाणार. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे का? याचा ही विचार केलेला दिसत नाही.
यापूर्वी झालेल्या शिबीरांचा अनुभव पाहता सकाळी शिबिराचे उदघाटन झाले की अधिकारी निघून जातात. समस्या सोडवण्यासाठी ज्यांना अधिकारच नाहीत असे कनिष्ठ कर्मचारी दुपारपर्यंत थांबतात. दुपार नंतर मात्र शिबिरात कोणीही उपलब्ध होत नाही असे अनुभव असल्याने शासनाच्या नियमानुसार प्रत्येक मंडलात शिबीरे आयोजित करणे आवश्यक असताना दोन दोन मंडलाचे एकत्र शिबीर घेण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
पुरंदर च्या महसूल विभागाने याची योग्य ती दखल घेणे गरजेचे असून शिबिरातील गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.
