बेलसर येथील तक्रारी शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन
तक्रारी शिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत
शाळा बंद आंदोलन
बेलसर ग्रामस्थांनी गाठले थेट पंचायत समिती कार्यालय
सासवड, दि. २३ पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील मठवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षक रियाज तांबोळी यांच्याबद्दल ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अमिता पवार व गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याकडे अनेक वेळा गंभीर तक्रारी केल्या. त्याची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.
मात्र प्रशासनाने ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली नाही.जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवार (दि.२२ फेब्रुवारी )पासून मठवाडी शाळा बंद करुन थेट पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.मात्र पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी संतप्त पालक व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन गटविकास अधिकारी अमिता पवार व गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांची एकत्रित बैठक घेऊन तडजोडीची भूमिका घेतली.
बेलसर येथील मठवाडी प्राथमिक शाळेमध्ये दोनच शिक्षकांची पदे मंजूर असताना देखील प्रशासनाने २८ ऑगस्ट २३ रोजी रियाज तांबोळी यांची अतिरिक्त शिक्षक म्हणून मठवाडी शाळेत बदली केली.
तांबोळी यांच्या बेशिस्त व बेजबाबदार वर्तणुकींबाबत पालकांनी अनेक वेळा तालुका प्रशासनाकडे गंभीर तक्रारी केल्या होत्या.
मात्र,प्रशासनाने तांबोळी यांना जाणीवपूर्वक पाठीशी घातल्याने त्यांचा बेजबाबदारपणा आणखी वाढला. दि.२ फेब्रुवारी रोजी तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना तीन तास लघुशंकेसाठी सोडले नाही.विद्यार्थ्यांना दमबाजी करत डांबून ठेवले.दोन विद्यार्थ्यांना किडनीचा गंभीर आजार असल्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले.तसेच स्वतःची फोर व्हीलर विद्यार्थ्यांकडून धुवून घेतल्याच्या गंभीर तक्रारी पालकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.
याबाबत शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी देखील ९ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर तक्रारींची विनाविलंब चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
मात्र,पुरंदरच्या गटविकास व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तांबोळींची चौकशी करत नसल्यामुळे आजपासून (दि.२२ फेब्रुवारी) तांबोळी यांची चौकशी होवून बदली होत नाही तोपर्यंत शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पालक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य मठवाडी प्राथमिक शाळेमध्ये एकत्रित आले.व सर्वानुमते शाळेमध्ये एकाही विद्यार्थ्यांला पाठवले नाही.पुरंदर प्रशासनाचा हलगर्जीपणा व दिरंगाई बाबत निषेध व्यक्त करत शाळा बंद करुन सर्व पालकांनी पुरंदर पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
पंचायत समितीमध्ये संतप्त महिला व पालक यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचे समक्ष प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक,शिक्षक पालक समितीच्या सदस्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नसल्याचे महिला सदस्या सुलभा जगताप यांनी यावेळी सांगितले.
जोपर्यंत तांबोळी यांची मठवाडी शाळेतून बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शाळा बंदच ठेवणार असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मठवाडी शाळा बंदच ठेवून ४८ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोय करुन नजिकच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल असे आमदार संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर तक्रारींची दखल विनाविलंब घेवून तांबोळी यांची बदली करण्यात यावी.व मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाआमदार संजय जगताप यांनी यावेळी गटविकास अधिकारी अमिता पवार व गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांना दिल्या.त्यानुसार २६ फेब्रुवारी पर्यंत निर्णय घेतला जाईल असे गटविकास अधिकारी पवार यांनी यावेळी सांगितले.