पराभव जिव्हारी; सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाकडून दमदाटी, शिक्षक वर्तुळात खळबळ! महिलेला दमदाटी; मध्यस्थीनंतर जाहीर माफी, तरीही नाराजी कायम
प्रतिनिधी
पुरंदर दि. २७
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीनंतरचा वाद आता चांगलाच चिघळल्याचे दिसून येत असून, पराभव सहन न झाल्याने एका सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाने नैराश्यातून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शिक्षक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अहंकार दुखावल्यामुळे संबंधित केंद्रप्रमुखाने एका महिलेला दमदाटी केल्याची बाब उघड झाली.हा प्रकार समजताच संबंधितांच्या निकटवर्तीयांनी तत्काळ हस्तक्षेप करत सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाला जाब विचारला. मात्र,परिस्थिती बिघडू नये म्हणून मध्यस्थी करण्यात आली.
त्यानंतर संबंधित केंद्रप्रमुखाने ज्या महिलेला दमदाटी केली, तिची जाहीर माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र,या घटनेमुळे शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण कायम आहे.
दरम्यान,या प्रकरणाचे पडसाद उमटत असून विद्यमान चेअरमन जितेंद्र कुंजीर यांच्यावरही कारवाई झाल्याची चर्चा रंगली आहे.त्यांची केंद्रप्रमुख संघटनेतून तसेच शिक्षक संघातून हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात जितेंद्र कुंजीर यांच्याशी संपर्क साधला असता, “संबंधित सेवानिवृत्तांच्या हस्तक्षेपामुळे मूळ शिक्षक संघातील प्रामाणिक सभासदांवर सातत्याने अन्याय होत असल्यानेच मी ही भूमिका घेतली.”
असे त्यांनी स्पष्ट केले.यापुढे पतसंस्था व संघटनेचे काम आदर्शवत पद्धतीने करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, या सर्व घडामोडींमुळे शिक्षक पतसंस्थेतील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र असून, पुढील काळात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत, राज्यातील तसेच जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय पक्षांमध्ये ज्या प्रकारे फोडाफोडीचे व एका दिवसात भूमिका बदलण्याचे राजकारण सुरू आहे, त्यालाही लाजवेल असे राजकारण पुरंदरमधील शिक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
