जनगणना कामकाजामुळे शिक्षकांच्या बदल्या यंदा होण्याची शक्यता कमी
प्रतिनिधी
जेजुरी, दि. १७
देशातील आगामी जनगणना २०२७ प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून त्याचा परिणाम शिक्षण विभागाच्या कामकाजावरही दिसून येत आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज १६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याने यंदा प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पुढे ढकलल्या जाण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी तथा प्रमुख जनगणना अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जनगणना २०२७ संदर्भात विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना (House Listing) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या टप्प्यात प्रत्येक घराची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता तसेच इतर मूलभूत माहिती संकलित करण्यात येणार असून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आवश्यक असलेली आधारभूत माहिती तयार केली जाणार आहे.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाणार आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार १६ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आपल्या शाळेच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीत शाळेचे मुख्यालय सोडण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच रजेचे अर्जही स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदाच्या जनगणना प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून “Census 2027” या मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. नागरिकांना स्व-गणना (Self Enumeration) करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मे-जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर जनगणना कामकाज सुरू राहणार असल्याने याच कालावधीत दरवर्षी होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. कही शिक्षक सेवा निवृत्त होतील त्या जागा रिकाम्या राहतील तर काही शिक्षकांना बदल्यांची अपेक्षा असताना, जनगणनेमुळे यंदा बदल्या होण्याची शक्यता कमी असल्याचा सूरही शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता ऑनलाइन बदल्यांबाबत शासन कोणता निर्णय घेते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. संजय नाईकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यातच शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र जानेवारी नंतर ही प्रक्रिया थंड पडलेली आहे. त्याबाबत अजून तरी वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.




