निवडणूकीपर्यंतच राजकारण मर्यादित असावे, – आ संजय जगताप

निवडणूकीपर्यंतच राजकारण मर्यादित असावे, – आ संजय जगताप
सामुहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात करू.. बेलसमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
जेजुरी, दि.२४ सध्या राज्याचे राजकारण बिघडत चालले असून याउलट स्थानिक पातळीवरील राजकारण केवळ निवडणूकीपुरते होत असल्याने प्रगल्भ होत आहे. सर्वसामान्यांना विकास महत्त्वाचा असून पुरंदरच्या मातीतच प्रगल्भता असल्याचा प्रत्यय इतिहासकाळापासून आजच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनापर्यंत तसेच पुरंदरमधील बेलसर पासून प्रत्येक गावातील सर्व जातीधर्मांच्या एकीमधून येत असून याची शिकवण राज्याने घेण्याची गरज आहे. विकासकामांत राजकारण न होता सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करू असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.
बेलसर ( ता.पुरंदर ) येथे ३५ लाखांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आ संजय जगताप यांच्या हस्ते आणि माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. याप्रसंगी बोलताना आमदार संजय जगताप यांनी, चारा लागवड, पुरंदर व जनाई उपसा जलसिंचन योजना, जलजीवन योजना, मृदू व जलसंधारण, पाटबंधारे आदी कामातून दुष्काळावर मात करू., शेतक-यांनीही कमी पाण्यावरील पिकांचे नियोजन करावे असे सांगत आगामी काळात होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिताफळ इस्टेट, रेशीम उद्योग केंद्र, गुंजवणी पाणी योजना आदींच्या माध्यमातून पुरंदरच्या शेतकरी, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले.
नाझरे धरणातून असलेल्या पाणी योजनांना जेजुरी एमआयडीसी योजनेतून तसेच शिवरी प्रादेशिक मधील योजनांना पिलाणवाडी पाझर तलावातून पाणीपुरवठा होणार आहे. जलजीवन योजना बारमाही जलस्रोतातून आणि सौर ऊर्जेच्या आधाराने होणार असल्याने आधिच्या योजनांप्रमाणे बंद पडणार नाहीत असे आ संजय जगताप म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्यात समन्वय असल्याने विकासकामे होत आहेत. आमदार एमबीए उच्चशिक्षित असल्याने त्यांनी जलजीवन योजनेचा चांगला डीपीआर केल्याने तालुक्यातील सर्व गावांचा यात समावेश होऊन कोट्यावधीचा निधी मिळाला असे माजी जि प सदस्य इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.

यावेळी मामा गरूड, उपसरपंच धिरज जगताप, माजी सरपंच विलास जगताप यांची भाषणे झाली. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महाविकास आघाडीचे समन्वयक नंदकुमार जगताप, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, निरा बाजार समितीचे उपसभापती महादेव टिळेकर, संचालक देविदास कामथे, गणेश होले, संभाजी काळाणे, सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच बाळासाहेब हिंगणे, सदस्य संभाजी गरूड, कैलास जगताप, पोलीस पाटील पायल राऊत, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष जगताप, प्रतापराव गरुड, बाळासाहेब जगताप, युवकचे गणेश जगताप, माऊली यादव, विकास इंदलकर, शहाजी गरूड, हरीभाऊ फुले, विजय गरूड, मिलींद जगताप, देविदास नाझीरकर आदी उपस्थित होते. संदीप जगताप यांनी सुत्रसंचलन केले तर माजी सरपंच धिरज जगताप यांनी आभार मानले.

———————————
पुरंदरमध्ये साखर कारखाना उभारणार….
पुरंदर उपसा, जनाई उपसा योजनेमुळे पुरंदरमध्ये ऊसाचे उत्पादन साडेपाच लाख मेट्रिक टनापर्यंत तर दुधाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना उभारणार असल्याची घोषणा आमदार संजय जगताप यांनी केली. तसेच पीडीसीसी बँकेच्या शाखेबाबत बेलसरकरांनी अनेक दिवसांपासून मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही आ जगताप यांनी याप्रसंगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page