जेजुरीकरांनी अडवले पालखी महामार्गाचे काम
जेजुरीकरांनी अडवले पालखी महामार्गाचे काम
जुन्या मार्किंग प्रमाणेच काम करावे, ग्रामस्थांची मागणी
जेजुरी, दि. २३ आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे जेजुरी शहरात सुरू असलेले काम जेजुरीकरांनी आज बंद पाडले. एक वर्षांपूर्वी केलेली मार्किंगप्रमाणेच महामार्गाचे काम करावे अशी मागणी ही महामार्ग ठेकेदार कंपनी टीआयपीएलचे मुख्य व्यवस्थापक अजय पाटील यांच्याकडे केली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून आळंदी ते पंढरपूर सहापदारी पालखी महामार्गाचे ( क्र.९६५) काम सुरू आहे. सध्या जेजुरी शहरातील लवथळेश्वर परिसरात काम सुरू आहे. या ठिकाणी भूसंपादन विभागाने सुरुवातीला केलेले मार्किंग आणि आता काम करताना केलेले मार्किंग यात मोठी तफावत आढळून आली. यामुळे महामार्गालागतचे बाधित ग्रामस्थ संतापले आहेत. आज दुपारी अडीच वाजता स्थानिक माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाधितांनी महामार्गावर जाऊन सुरू असलेले काम रोखले. महामार्गाचे काम करणारे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन याबाबत आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा. चुकीच्या पद्धतीने काम करू नये. भूसंपादन करताना जेवढ्या जागेचे भूसंपादन केले आहे व त्याची भरपाई आम्हाला दिलेली आहे तेवढीच जागा घ्यावी. अशी मागणी करीत बाधित ग्रामस्थांनी काम बंद पाडले. ठेकेदार कंपनीचे मुख्य व्यवस्थापक अजय पाटील यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी आणि आमची बैठक झाल्याशिवाय काम करू नये. तसा प्रयत्न केल्यास काही अनुचित प्रकार झाला तर त्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीची असेल असे अजिंक्य देशमुख यांनी कंपनी व्यवस्थापनाला सुनावले. येत्या सोमवारी ( दि. २५ ) याबाबत बैठकीचे नियोजन असून त्यानंतरच मार्गाचे काम सुरू करावे असा ग्रामस्थांनी आग्रह धरल्याने कंपनीला काम बंद करावे लागले.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, महेश म्हेत्रे, सोपान झगडे, दादा झगडे, दीपक काकडे, म्हाळसाकांत आगलावे, संदीप केंजळे, राहुल मुंडलीक, सत्यवान चाचर, काळूराम थोरात, शरद निकुडे, घनश्याम निकुडे, सुनील साबळे, हौशीराम सागर आदींसह पन्नास बाधित उपस्थित होते
——–—————
याच महामार्गाच्या कामात दुसऱ्या बाजूच्या बाधितांना राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन सक्षम प्राधिकाऱ्यांनी जादा जमिनी संपादित झाल्या असून त्याच्या मोबदला म्हणून दिलेली रक्कम परत करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. यामुळे बाधितांना मनस्ताप सहन करावा लागत असून मोठी नाराजी निर्माण झालेली आहे. याबाबत ही बाधितांतून तक्रारीचा सूर येत आहे