नाझरे कप परिसरात बिबट्याची दहशत, चार शेळ्या मेंढ्या हल्ल्यात दगावल्या
जेजुरी, दि. २१ पुरंदर तालुक्यातील नाझरे क.प. परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळ्या आणि दोन मेंढ्या दगावल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत परिसरातील शेतकऱ्यांकडून नाझरे परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याची चर्चा होती. यामुळे शेतकरीवर्ग धास्तावलेला होता. वनविभागाकडे याबाबतीत माहिती ही देण्यात आली होती. मात्र वनविभागाकडून दुर्लक्ष झाले आणि आज हा प्रकार घडला आहे
सायंकाळी साडे सहा सात वाजण्याच्या सुमारास नाझरे गावच्या हद्दीतील चिकणे वस्तीनजीकच्या सागर नामदेव चिकणे यांच्या शेतात मेंढपाळ मारुती महानवर यांच्या शेळ्या मेंढ्यांच्या पाल उतरलेले होते
सुमारे दोनशे शेळ्यामेंढ्यांच्या पालावर सायंकाळी साडे सहा सात च्या सुमारास अचानक हल्ला केला. मेंढपाळ असल्याने त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात दोन शेळ्या आणि दोन मेंढ्या दगावल्या. यात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहेच.
मात्र परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
यापूर्वी ही या परिसरात बिबट्या वास्तव्यास असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले होते. याबाबत जेजुरीतील वनविभागाचे कर्मचाऱ्यांना माहिती ही देण्यात आली होती. मात्र वनविभागाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने आजचा हा प्रकार झाला आहे. मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहेच. वनविभागाने याचा रीतसर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. याशिवाय याभागातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी केली आहे
अशाच प्रकारे जेजुरी शहरालगतच्या कडेपठार रस्त्यालगत चिंच बागेच्या परिसरात ही अनेक दिवसांपासून बिबट्या वावरत असल्याचे समजते. परिसरातील रहिवाशांना अनेकदा बिबट्या दिसलेला आहे. परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे याबाबत तक्रार ही केलेली आहे. वन विभागाने याकडे ही गांभीर्याने पाहावे अशी मागणी ही जेजुरीतील नागरिकांनी केली आहे.