भर सोमवती यात्रेनिमित्त दोन लाखांवर भाविकांची जेजुरीत गर्दी सदानंदाचा येळकोट च्या जयघोषात दुमदुमला जेजुरी गड
भर सोमवती यात्रेनिमित्त दोन लाखांवर भाविकांची जेजुरीत गर्दी
जेजुरी, दि. ८ ( प्रतिनिधी)
नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला फाल्गुन महिन्यातील अमावस्येनिमित्त भरलेल्या सोमवती यात्रेत सुमारे दोन लाखांवर भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.
सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरीत आले होते.
सोमवारी पहाटे ३वा. २० मि. अमावस्या सुरू झाली असून आज रात्री ११वा. ५१ मि. अमावस्येचा कार्यकाल संपतो. यामुळे आज संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने त्याच बरोबर उद्या दि. ९ रोजी चैत्र मासारंभ आणि गुडी पाडवा असल्याने भाविकांनी काल रविवारी (दि.७) पासूनच जेजुरीत गर्दी केली होती. आज दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. गडकोटातील आणि सज्जावरील भाविकांनी भंडार खोबऱ्याच्या उधळणीत सदानंदाचा येळकोट च्या जयघोष करीत पालखी ला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळया जर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. पालखीचे मानकरी खांदेकऱ्यांनी देवाची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली. देवाच्या सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या. आणि निघाला देवाच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडकोटाबाहेर पडला.
यावेळी देव संस्थान चे मुख्य विश्वस्त अनिल सौन्दडे, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अड् विश्वास पानसे,
अड् पांडुरंग थोरवे, डॉ.राजेंद्र खेडेकर,
अभिजित देवकाते, जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि. दिपक वाकचौरे, देव संस्थान चे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक गणेश डिखळे, कर्मचारी उपस्थित होते
खांदेकरी मानकऱ्यांनी वजनाने जड असणारी पालखी खांद्यावर लीलया पेलत गडकोटाबाहेर प्रस्थान ठेवले. गडकोटाचा पायरीमार्ग, पायथ्याचा नंदी चौक, ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानुबाई चौकातून सोहळ्याने शिवाजी चौक मार्गे कऱ्हा नदीकडे कूच केले.
सायंकाळी ५.४५ वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकऱ्यांनी उत्सव मूर्तींना विधिवत स्नान घातले. दुष्काळी परिस्थितीमुळे नदीपात्रातील पाणी डोहामध्ये आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले तर पालिकेच्या टँकरद्वारे पालखी सोहळ्यातील भाविकांवर पर्जन्यवृष्टी करण्यात आली. यावेळी सोहळ्यासोबत असणाऱ्या हजारो भाविकांनी कऱ्हा स्नान उरकून यात्रेचे पुण्य मिळवले.
यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, रानमळा, कोरपडवस्ती, दवणे मळा येथील मान स्वीकारत रात्री ८ वाजता सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसावला. रात्री उशीरा सोहळा गडकोटात पोहोचला. रोजमारा वाटप आणि स्नेहभोजनाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्याचे नियोजन पालखी सोहळा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी सुधीर गोडसे, गणेश आगलावे, संतोष खोमणे, कृष्णा कुदळे, अमोल शिंदे, गिरीश झगडे रामभाऊ माळवदकर, शैलेश राऊत आदिंनी केले होते.
दिवसभर सोमवती यात्रा असल्याने काल पासूनच जेजुरीत भाविकांची गर्दी होती. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती, प्रचंड तापमान असणारा उन्हाळा, सूर्यग्रहण काल, आणि उद्याचा गुडीपाडवा यामुळे भाविकांची गर्दी कमी राहिली. मात्र यात्रा सुफल आणि सुव्यवस्थित पार पडावी म्हणून जेजुरी पोलिसांनी सासवड विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मारहादर्शनाखाली जेजुरीचे सपोनि दिपक वाकचौरे यांनी १३ पोलीस अधिकारी आणि १६० पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.
मार्तंड देव संस्थान कडून उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून पालखी सोहळ्यातील खांदेकऱ्यांना पायमोजे, टोप्या, आणि ठिकठिकानी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. जेजुरी नगरपालिकेने ही पिण्याच्या पाण्याची सोय केलेली होती.. एस.टी. महामंडळा कडून जादा बसेस ची सोय केलेली होत