महामार्ग रुंदीकरण झाले, नोंदणीकृत पथविक्रेत्यांचे काय?
जाणीव संघटनेची जेजुरी पालिकेकडे विचारना
जेजुरी, दि.३० गेल्या २२ मे रोजी जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ या मार्गावरील २२५ नोंदणीकृत पथ विक्रेत्यांच्या दुकानांवर व ५० घरांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे २७५ कुटुंब आता रस्त्यावर आली आहेत. याबाबत जेजुरी नगरपालिका काय निर्णय घेणार अशी विचारणा पुणे जाणीव संघटनेकडून जेजुरी नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.
जेजुरीतील नोंदणीकृत पथ विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईला जाणीव संघटनेचे कार्यवाह संजय शंके यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव संघटना व दिलासा जन विकास संस्था जेजुरी शाखेच्या वतीने प्रखर विरोध केला आहे.
बांधीत दुकाने व घरे यांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी जाणीव संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश भुजबळ, आणि दिलासा जन विकास संस्थेच्या अध्यक्षा स्वाती माळवदकर यांनी केली आहे. पथ विक्रेता समिती जेजुरी नगरपरिषदेचे सदस्य गौरी लांघी, संगिता चांदेकर, लतिफा मणेर, शांताराम खोमणे, बाळासाहेब माळवदकर, यांच्या समवेत जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना याबाबत लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
याबाबत पथ विक्रेता समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी श्री. इंगोले यांनी दिले आहे.
आश्वासनानुसार कार्यवाही झाली नाही तर जाणीव संघटनेच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर आंदोलनाचा इशारा ही संघटनेचे कार्यवाही संजय शंके यांनी दिला आहे