जेजुरीतील पॅराग्लायडर दुर्घटना मालक व चालकावर गुन्हा दाखल

जेजुरीतील पॅराग्लायडर दुर्घटना मालक व चालकावर गुन्हा दाखल

जेजुरी,दि.१३ कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये गेली वर्षभरापासून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकभक्तांना पॅराग्लायडिंग द्वारा (पॅराशूट) जेजुरी शहर ,गडकोट ,व जयाद्री डोंगररांगेची हवाई सफर घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्या फ्लाईंग रिनो पॅरामोटरिंग सेंटरचे मालक नीता प्रशांत काकडे ,व चालक चंद्रकांत लक्ष्मण महाडिक या दोघांवर जेजुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम २८७,३३६,३३७,३३८,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दुर्घटनेतील जखमी युवती आस्था प्रदीप माने रा.वाकड ,पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.रविवारी (दि.१२)सायंकाळी ५;३०वाजण्याच्या दरम्यान आस्था माने यांना पॅराग्लायडर (पॅराशूट) मध्ये बसवून चालक चंद्रकांत महाडिक यांनी आकाशामध्ये उड्डाण केले होते ५००ते ६००फूट उंचीवर असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पॅराग्लायडर मध्यवस्तीमध्ये एका पत्र्याच्या घरावर कोसळले होते.यामध्ये फिर्यादी आस्था माने या गंभीर जखमी तर चालक महाडिक हे किरकोळ जखमी झाले . घराचे पत्र्याचे छत कोसळले .अचानक मोठा आवाज झाल्याने घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिला बाहेर पळाल्या. विशेष बाब म्हणजे रविवार हा देवदर्शनाचा वार असल्याने शहरामध्ये ,चिंचेच्या बागेतव परिसरात भाविकांची लक्षणीय गर्दी होती.केवळ देवाच्या कृपेमुळे मोठा अनर्थ टळला असे नागरिक बोलत आहेत. पॅराग्लायडिंग उड्डाणस्थळापासून हाकेच्या अंतरावर ऐतिहासिक होळकर तलाव ,चिंचेची बाग ,पुरातन मल्हार गौतमेश्वर मंदिर असून या परिसरातच जिजामाता महाविध्यालय ,शरदचंद्रजी पवार महाविद्यालय आहेत.तसेच हा परिसर नेहमीच भाविकांच्या वर्दळीचा असतो.याबाबी पाहता भाविकांचा व ऐतिहासिक स्थळांच्या सुरक्षिततेचा प्रश्नावरून ग्रामस्थांमध्ये या व्यवसायाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या .आरपीआयचे युवा कार्यकर्ते अमोल साबळे यांनीही याबाबत मागील तीन महिन्यांपूर्वी आवाज उठवला होता.या व्यवसायासाठी केंद्राच्या व संबंधित विभागाच्या परवानग्या मिळवल्या असल्या तरी ऐतिहासिक स्थळे व भाविकांच्या सुरक्षिततेचे काय?असा प्रश्न आता ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.एका हवाई सफरीसाठी भाविकांकडून १५००ते २हजार रुपये आकारले जात आहेत .त्यामुळे हवाई सफरीसाठी लागणारी सावधगिरी बाळगणे तसेचउड्डाण करणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब तपासणे गरजेचे असल्याचे काही नागरिकांनी बोलून दाखवले.
एकूणच पॅराग्लायडिंग व्यवसायाबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांचेशी संपर्क साधून माहिती घेतली असता .जखमी युवतीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अहवाल जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page