GOLDEN BRAND’S OF MAHARASHTRA. के.डी.चौधरी उद्योग समूह. एक हारा ते १०० कोटी -एक चित्तथरारक प्रवास…
पुणे, ( कवी राजेंद्र सोनवणे )
माय माऊली लक्ष्मीबाई यांनी आपली एक शेळी विकून त्यातील थोडेफार पैसे भांडवल म्हणून आपल्या मुलाला दिले..
असून असून ते भांडवल असणार तरी किती?ते भांडवल होते पन्नास रुपये.पण मित्रांनो त्या भांडवलात एका आईच्या सदभावनेची जीची किंमत करोडोत देखील करता येणार नाही अशी गुंतवणूक होती…
त्या आईची एकच इच्छा होती.एक आंतरिक तळमळ होती ती म्हणजे माझी लेकरे हातात कुदळ घेऊन दुसऱ्याच्या बांधावर जाताना मला पहायचे नाही…
आदरणीय दगडू भाऊ उर्फ (आण्णा)चौधरी व माय लक्ष्मी बाई यांचा हा पाच मुलांचा संसार…
काळुराम (दादा),गणपतराव (आप्पा),संपतराव (तात्या) व तानाजीराव (बाप्पू) तसेच सुकन्या जिजाबाई ही त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमललेली फुले..
सोरताप वाडीत एक एकर जमिनीचा तुकडा. प्रपंचाची तशी ओढतानच.आपल्या मुलांच्या आणि स्वतःच्या भाकरी साठी दगडूभाऊ म्हणजेच अण्णांनी हातात कुदळ घेतली होती…
आण्णा यांच्यावर संसाराची पूर्ण जबाबदारी आली होती.घरच्या एक एकर शेतीतून साधी घरची मीठ मिरची भागेल अशी परिस्थिती नव्हती…
जगण्या साठी केवळ कुदळ हाच एकमेव आधार अण्णांना जवळचा वाटत होता…
अगोदर त्यांना भाकरीची लढाई महत्वाची वाटत होती..त्यात वावगे तरी काय होते.
गरीबी ही भविष्याच्या सुंदर स्वप्नांचा देखील गळा घोटत असते.
पण एक आई म्हणून माय लक्ष्मी बाई यांचे स्वप्न मात्र जीवंत होते…
मी एकवेळ चांगली कपडे घेणार नाही.माझ्या अंगावर गुंजभर सोने नसले तरी चालेल पण मी माझ्या मुलांना शिकवणारच ही जिद्द त्यांनी मनात बांधली होती…
काळूराम दादा तर परिवारात सर्वात थोरले.परिस्थितीने तर त्यांचे ही बालपण पार करपून गेले होते..
अण्णांना वाटायचे मुलगा हाताला आला आहे.घरात कमावणारे दोन हात होतील…
दादां ना आई वडिलांचे हाल पाहवत नव्हते पण त्यांनी एक केले त्यांनी ऐकलं आपल्या आईचे..त्यांची आई त्यांना कायम म्हणायची,काळू बाळा तू शिक मला तुला साहेब झालेला पहायचे आहे.हे सांगताना एका भोळ्या भाबड्या आईचे डोळे भरून यायचे…
वयाच्या दहा पंधरा वर्षांपासून काम करत दादा शिकले.प्रसंगी हमाली केली,पिठाची गिरणी चालवली पण काळूराम दादा त्या काळात एल एल बी ची पदवी घेऊन वकील झाले…
माझ्या बरोबर कामाला येत नाहीस शिकून लय मोठा बॅरिस्टर होणार आहेस असे कधी काळी त्या वेळच्या परिस्थितीने खवळणाऱ्या दगडू भाऊ म्हणजेच अण्णांचे मोठे चिरंजीव वकील झाले होते…
पण एका आईचा हा मोठा विजय होता..
एका आईचे स्वप्न जिंकले होते…
के.डी.चौधरी या उद्योग समूहाची शून्यातून उभारणी करणारे हेच ते नाव म्हणजे आदरणीय काळूराम उर्फ दादा दगडू चौधरी..
याच नावावर आपल्या सर्व भावंडाना बरोबर घेऊन एक उद्योग समूह निर्माण केला..
होय!तोच हा के.डी.चौधरी उद्योग समूह..
स्नेहलता ताई या दादांच्या पत्नी यांचे देखील या परिवारात आगमन झाले आणि घरात लक्ष्मीची पावले यायला सुरुवात झाली..
घरात आलेल्या प्रत्येक सुना घरची लक्ष्मी आणि लेकी झाल्या…
चौधरी परिवाराला उभे करण्यात मजबूत ठेवण्यात या
सुकन्यांचा वाटा देखील खूप मोठा आहे…
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व नातवंडे सुशिक्षित झाली आहेत.काळूराम दादांचे व आई लक्ष्मी बाई यांचे स्वप्न होते ते म्हणजे गणपत अप्पांनी डॉक्टर व्हावे आणि मुख्य म्हणजे आप्पा तितके हुशार देखील होते.पण आर्थिक अडचणी मुळे हे शक्य झाले नाही पुढे ही कसर काजल चौधरी झेंडेपाटील या अप्पांच्या सुकन्येने डॉक्टर होऊन भरून काढली…
सोरताप वाडीवरून दगडू भाऊ अण्णा एकेकाळी चालत
दुसऱ्याचा ऊस खांदायला मांजरी पर्यंत यायचे.आई लक्ष्मी देखील शेतात मोलमजुरी करूनच आपल्या संसाराला हातभार लावत होत्या..
आस पासचे नातेवाईक बऱ्यापैकी सदन पण नातेवाईकांना मदत न मागता स्वाभिमानाने आणि परिस्थितीने त्यांनी हातात कुदळ घेतली होती…
ते त्यांच्या जिंदगीत खुष होते.त्यांची सारी स्वप्ने त्यांच्या दगडूभाऊ नावा सारखीच घट्ट झाली होती…
त्यांचा एकच अंतिम आधार होता तो म्हणजे पंढरीचा विठुराया…
या विठुरायाला देखील ते काय मागत असतील ते कधीच कुणाला कळले नाही..
काळ हळू हळू बदलत होता.पण चौधरी परिवाराचे दिवस तसेच स्थिर होते…
एका गरीब शेतकऱ्याच्या नशीबी ज्या वेदना दुःखे असतात ती एके काळी काळूराम दादा,गणपत आप्पा,संपत तात्या, तान्हाजी बाप्पू, या सर्व लेकरांच्या वाट्याला आली.
सर्व भावंडे तशी शाळेत हुशार होती.फक्त तान्हाजी बाप्पू सोडून तो एक फार मोठा वेगळा विषय आहे.प्रत्येकात क्लासवन अधिकारी होण्याची क्षमता होती..
पण परिस्थितीने त्यांना साथ दिली नव्हती…
नियतीच्या मनात वेगळेच होते.कदाचित दादा,अप्पा,आणि तात्या जर अधिकारी झाले असते तर हा के.डी.चौधरी.हा गरीब शेतकऱ्यांचा तारण हार ठरलेला उद्योग समूह आपणांस दिसलाच नसता…
परिस्थितीच्या निखाऱ्यात हा चौधरी परिवार सर्व बाजूंनी होरपळून निघत होता…
या परिवारा कडे कदाचित आर्थिक कमतरता होती पण मनाची श्रीमंतीआणि एकजुटीची ताकत फार मोठी होती.
आपले पैसेवाले नातेवाईक सोडून त्यांनी सर्व जातीभेद विसरून आसपासची गरीब दीन दुबळी माणसे मनाने आपली मानली…
एकमेकांच्या सुख दुःखात तीच एक मेकांना आधार देऊ लागली…
शेतकऱ्यांची गरीबी नुसती समजून नव्हे तर तीचा कडवट काढा पिऊन हा चौधरी परिवार पुढे आला आहे…
पुढे काळूराम दादांनी सायकलला हारा बांधून भाजीपाला विकायला सुरवात केली..
काही वेळा तर सायकलची पंक्चर काढायला पैसे नसायचे.पण दादा निराश झाले नाहीत…
अनेक वेळा लोकांनी त्यांना फसवले पण दादांनी सारे सारे सहन केले…
दलाली सारखा व्यवसाय करताना आई वडिलांचे संस्कार ते कधी विसरले नाही…
एक वेळ आम्हीं उपाशी मरू पण लबाडी करणार नाही हा महामंत्रच खऱ्या अर्थाने चौधरी परिवाराचे फार मोठे भांडवल आहे…
हळू हळू या प्रामाणिक तेच्या कसोटीने एक एक शेतकरी चौधरी परिवाराने जोडला नुसता जोडलाच नव्हे तर त्यांची लूट न करता त्यांचा शेतमाल प्रामाणिक पणे विकून त्यांचे संसार उभे केले..
फायद्या तोट्याचा विचार न करता चौधरी परिवाराने ज्या ज्या व्यवसायात हात घातला त्याचे सोने केले…
त्यात सूरवातीला भाजीपाला व बोरे या शेतमालाचा समावेश होता…
नंतर काळूराम दादा यांच्या विचारा प्रमाणे सर्व भावंडे के.डी.उद्योग समूह म्हणून एकजुटीच्या वज्र मुठीने काम करू लागली…
एक छोटासा तरकारीचा गाळा,ते आज महाराष्ट्रातील सर्वात मोठे डाळिंब विक्री केंद्र म्हणून के.डी.चौधरी परिवाराचा नावलौकिक देशभरात झाला आहे…
इंदापूर नंतर हा कधी काळी एका गरीब सर्वसामान्य शेतकऱ्याचा हा परिवार राजस्थान मध्ये जवळ जवळ १५ एकरात डाळिंब विक्री केंद्र असणारे एक मोठे हब निर्माण करीत आहे…
आज पुण्यात मध्यवर्ती मार्केट यार्ड या ठिकाणी प्रशस्त असे डाळिंब विक्रीचे केंद्र उभे आहे…
डाळिंब पिकाच्या माध्यमातून एके काळी नव्हे तर आज ही महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मणका मजबूत करण्यात या परिवाराने फार मोठा हातभार लावला आहे..
यात तानाजीराव चौधरी यांचे योगदान फार मोठे आहे.नव्या जगाच्या बाजारपेठेची दिशा ओळखण्याची यांची क्षमता अनेक पदवीधरांना लाजवू शकते…
तान्हाजी बाप्पू चौधरी नववी नापास आहेत हे जर मी तुम्हाला सांगितले तर तुम्हीं मला म्हणताल राजाभाऊ फेका मारू नकोस…
ती पण मोठे बंधू गणपत अप्पांच्या माराची भीती नसती तर कदाचित नववी पण झाली नसती असेच वाटते..
मला देखील जेंव्हा स्वतः त्यांनी हे सांगितले त्या वेळी मी त्यांना म्हणालो होतो..
साहेबा तुम्हीं माझी चेष्टा करताय पण हे सत्य आहे…
शाळेत नापास झाले म्हणजे सारे काही संपले असे कधीच नसते…
जी शेतकऱ्यांची पोरं नापास झाली आहेत, ना उमेद होऊन हिरमुसली आहेत. त्यांनी तानाजीराव यांचा जीवनपट पहावा…
तानाजीराव जगाच्या विध्यापीठात शिकले.एक एक माणूस अंतःकरणाने वाचत ते पुढे आले…
प्रत्यक्ष व्यवहाराने त्यांना खूप काही शिकवले.
मुख्य म्हणजे ते माणसांची पुस्तके वाचायला शिकले…
दोन सेकंद एखाद्याच्या चेहऱ्यावरून जरी त्यांची नजर फिरली तर मुळापासून माणूस ओळखण्याची त्यांची क्षमता आपल्या सर्वांना थक्क करणारी आहे…
फक्त त्यांची डिगरी कागदावर सर्टीफाईड झाली नाही तरी काही फरक पडत नाही…
पराभव हाच आपला मोठा गुरू असतो.तानाजीराव यांच्या सह चौधरी परिवाराने अनेक पराभव देखील भोगले आहेत.पण पराभवांचे भांडवल करणे यांच्या रक्तातच नाही…
जया अंगी मोठे पण तया यातना कठीण..
हिरा ठेवीता ऐरणी
वाचे मारता जो घनी
मोल तोचि पावे खरा
करणीचा होय चुरा
तुका म्हणे तोचि संत
सोसि जगाचे आघात
या तुकोबांच्या अभंगात तुम्हांला पूर्ण चौधरी परिवार दिसेल…
ऐरणीवर गारगोटी आणि हिरा ठेवला आणि त्यावर घन किंवा हातोडा मारला तर चुरा गारगोटीचाच होत असतो.हिरा शेवटी हिराच असतो…
तानाजी राव यांचे तीर्थरूप वडील आण्णा विठ्ठलाचे असीम भक्त होते.पण मोल मजुरी करून पंढरपूरला जायला देखील त्यांच्या कडे पैसे जमा होत नसत..
पंढरीचा विठुराया त्यांची कायम परीक्षा घेत असे…
एकदा तर वेळ पडली तर माझी चारी मुले तुमचा ऊस खांदायला येतील म्हणून उचल घेऊन ते पंढरीला गेलेच…
नंतर विठुरायाने त्यांना इतके दिले की हा विठ्ठलाचा साधा भोळा भक्त समाधानाच्या असीम सुखात विलीन झाला…
दुसऱ्याचा ऊस खंदत आयुष्य जगणाऱ्या आपल्या वडिलांच्या म्हणजेच अण्णांच्या समाधानासाठी त्यांच्या या कोहिनूर सुपुत्रांनी १०० एकर जमीन खरेदी केली…
वयाच्या ९७ वर्षी हे पाहण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
तुमची भावना निर्मळ असेल तर कधीना कधी परमेश्वर चांगले फळ देतोच…
चौधरी परिवाराची कथा इतिहास फार मोठा आहे…
त्या साठी शेकडो पाने कमी पडतील…
एकदा तानाजीराव अण्णानं बरोबर शेळी विकण्यासाठी बाजारात गेले. लहान तानाजीराव यांना शेळी विको अथवा न विको याच्याशी काही देणे घेणे नव्हते..
त्यांना खायची होती फक्त भेळ.एका हरामखोर व्यापाऱ्याने शेळीला कात्री मारली.सारा बाजार संपला तरी त्यांची शेळी विकली गेली नाही.कट करून हे नालायक व्यापारी असे उद्योग करत असतात हे शेतकऱ्यांना कळत नाही…
तानाजीराव भेळ पाहिजे या हट्टाला पेटले होते.अण्णांच्या जवळ भेळ घ्यायला पैसे नव्हते वयाने लहान असलेले तान्हाजी राव मोठं मोठ्याने रडू लागले..
शेवटी अण्णांनी कुणाकडून तरी पैसे उसने घेऊन त्यांना भेळ घेऊन दिली…
हा प्रसंग बाप्पू आज ही विसरले नाहीत..
पुढे या प्रसंगाचा अर्थ लक्षात आल्यावर तान्हाजी बाप्पू यांनी मनाशी खूणगाठ बांधली मी आयुष्यात कधी ही शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला अशी नालायक वृत्तीची कात्री लावणार नाही…
आपल्या तीर्थरूप अण्णांच्या स्मरणार्थ दर वर्षी निवडक गरीब शेतकरी माय बापास ते हेलिकॉप्टरमधून पंढरी ला घेऊन जाणार आहेत…
कारण एकच एके काळी अण्णांस पंढरपुराला जायला पैसे नसायचे…
धन्य ते माता पिता आई लक्ष्मीबाईं आणि अण्णांनी आपल्या लेकरांचे हे कर्तृत्व आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे..
आपल्या महाराष्ट्रात असे अनेक परिवार आहेत की जे अत्यंत आई वडिलांच्या कष्टा ने कष्टातून पुढे आले.पण हे सुख ते आपल्या माय बापास दाखवू शकले नाहीत.
ही खंत ही सल त्यांना कायम जाणवत राहते..
त्या बाबतीत मला संपूर्ण चौधरी परिवार खूप सौभाग्यशाली वाटतो…
त्यांचे सारे यश त्यांच्या आई वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य जगून पाहिले…
सर्व नातवंडे शिकता सवरताना पुढे जाताना पहिली…
ज्या उद्योग समूहांच्या पायात असे मात्या पित्यांचे आई,अण्णांचे,आशीर्वाद आहेत…
त्यांना जगातील कोणती ही महाशक्ती रोखू शकत नाही..