अनधिकृत महामार्ग होर्डिंग्स हटवणे नगर पालिकांचा पुढाकार, ग्रामपंचायत व इतर विभाग मागे का?

बी. एम. काळे
जेजुरी, दि.२९ मुंबई घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्य प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने राज्यभरातील अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याचे महापालिका, पालिका, ग्रामपंचायतीना आदेश देऊन अशी होर्डिंग्स हटवण्याचे आदेश दिले. पुणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांनी असे होर्डिंग्स हटवण्याच्या मोहिमा राबवून अनधिकृत होर्डिंग्स हटवले. मात्र अजुनही मोठमोठी होर्डिंग्स मुख्य रस्ते आणि महामार्गलागत आहेत. ही होर्डिंग्स त्या त्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत आहेत.काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे रस्ते विकास प्राधिकरण, महसूल विभाग या कारवाईत मागे का? असा सवाल नागरीक, तसेच प्रवाशी उपस्थित करू लागले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतर या विभागांना जाग येणार आहे काय?.असा संतप्त प्रतिक्रिया ही येत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी नगरपालिकांनी बेकायदा उभारलेले होर्डिंग्स हटवण्याची मोहीम राबवली आहे. अनधिकृत अशी होर्डिंग्स हटवण्यात आली आहेत. मात्र दिवे घाट ते नीरा या पालखी महामार्गालगत अशी अनेक मोठं मोठीं होर्डिंग्स उभी आहेत. अनेक होर्डिंग्स ची दुरावस्था झालेली आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. सोसाट्याचा वारा, वादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. काही होर्डिंग्स कोसळल्याच्या घटना ही घडलेल्या आहेत. वाहनांवर ही होर्डिंग्स कोसळल्याच्या घटना असून केवळ चालकांच्या प्रसंगावधानाने अनुचित घटना घडलेल्या नाहीत. दिवे घाटा पासून निरेपर्यंत पालखी महामार्गालगतचे धोकेदायक होर्डिंग्स त्वरित हटवणे गरजेचे बनले आहेच. शिवाय अनधिकृत होर्डिंग्स वर ही कारवाई होणे आवश्यक आहे. महामार्गलगतचे होर्डिंग्स ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने त्यांवर त्या त्या ग्रामपंचायतीनी कारवाई करावयास हवी. पालखी महामार्ग असल्याने पुढील महिन्यात ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येत आहे. यापूर्वीच अशी होर्डिंग्स हटवणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील ग्राम पंचायत, राष्ट्रीय महामार्ग, पुणे विकास प्राधिकरण आणि पुरंदर महसूल हद्दीतील तहसील कार्यालयाकडून अशी होर्डिंग्स हटवणे गरजेचे बनले आहे. मात्र या सर्वच विभागाकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. होर्डिंग्स हटावण्याची शासकीय मोहीम पाहून काही होर्डिंग्स धारकांनी स्वतः हून होर्डिंग्स काढली असली तरी ही अनेकांनी उलट रंगरंगोटी करून नव्याने जाहिरातीसाठी संपर्क करण्याच्या जाहिराती केल्या आहेत. कोणत्याही परवानग्या नाहीत. स्टक्चर ऑडिट नाही. केवळ महामार्गालगत मोक्याच्या जागा हेरून अनेकांनी असे होर्डिंग्स उभे केले आहेत.

याबाबत पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमिता पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीना गावठाण हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्स हटवण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांनी ही याबाबत पुरंदरचे तहसीलदार यांना सूचना दिल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page