जेजुरीधार्मिकपुरंदर

महाशिवरात्री निमित्त जेजुरी गडावर त्रिलोक दर्शन

पुरंदर प्रतिनिधी
जेजुरी, दि. १५ महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठीं गर्दी झाली आहे. ‘सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट, जय मल्हार’ आणि ‘हर हर महादेव’ च्या गजरात, भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी त्रिलोक दर्शनाचा लाभ घेतला.
महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने आणि महाशिवरात्रीनिमित्त रविवारी पहाटेच मंदिर भाविकासाठी खुले करण्यात आले होते.
मध्यरात्री १२ वाजता गडावरील मुख्य मंदिराच्या कळसातील म्हणजेच स्वर्गलोकीचे शिवलिंग, मुख्य गाभाऱ्यातील भुलोकीचे शिवलिंग तर गाभाऱ्यातीलच उजवीकडे असणाऱ्या भुगर्भातील पाताळलोकीचे शिवलिंग दर्शनासाठी खुले करण्यात आले. वर्षाकाठी फक्त महाशिवरात्रीलाच या तीनही लिंग दर्शनासाठी खुले केले जातात. मुख्य मानकरी, उपाध्ये, पुजारी, नित्य वारकरी, ग्रामस्थ याच्या हस्ते विधिवत अभिषेक पूजा होऊन पहाटेच्या सुमारास ही तीनही लिंग दर्शनासाठी खुली करण्यात आली. सलग दोन दिवस या लिंगाचे दर्शनाचा लाभ मिळनार आहे.
राज्यभरातील आलेले भाविक दर्शन रांगा लावून देव दर्शन घेत होते.
यावेळी देव संस्थानचे विश्वस्त, कर्मचारी, जेजुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी भाविकांना सुलभ देव दर्शन व्हावे म्हणून नियोजन करीत होते.
महाशिवरात्री निमित्त मार्तंड देव संस्थान कडून संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषनाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. काही भाविकांकडून दर्शन रांगातील भाविकांना फराळ वाटप करीत होते.
देव संस्थानने यावेळी मुख्य गाभाऱ्यातील दोन्ही शिवलिंगे आणि कळसातील लिंग दर्शन सुलभ व्हावे म्हणून दोन स्वतंत्र दर्शन रांगा निर्माण केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page