15 ऑगस्ट …भारतीय स्वातंत्र्याचा दिवस, इंग्रजांच्या जोखडातून भारतमाता मुक्त झाली
आज 15 ऑगस्ट …भारतीय स्वातंत्र्याचा दिवस, इंग्रजांच्या जोखडातून भारतमाता मुक्त झाली. खऱ्या अर्थाने देशवासीयांना स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचा सण आज संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे.
१५० वर्षे भारतीय जनता परकीयांच्या आदिपत्याखाली होती. त्यांचे परकेपणा भारतीयांना बंधनात ठेवत होता. बंधमुक्त होण्यासाठी देशातील असंख्य देशप्रेमींनी इंग्रज राजवटी विरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशप्रेमींनी आणि स्वातंत्र्यप्रेमींनी दिलेल्या बलिदानाचे फलित आज आपण स्वतंत्र आहोत.
इंग्रजांनी १५ ऑगस्ट १९४७ साली भारतीयांना स्वातंत्र्य बहाल केले. आज आपण स्वातंत्र्याचे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. गेल्या ७५ वर्षात आपल्या देशाने विविध क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. जगभरात भारत देशाला एक लोकशाही शासन असणारा देश म्हणून संबोधले जाते. सर्वात मोठी लोकशाही म्हणजे काय? याचा अभ्यास जगभरातील विचारवंत करीत आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळवून आपण काय मिळवले याचा विचार करण्यापेक्षा आपण काय मिळवायला हवे याचाच विचार करणे आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे. अनेक अशी क्षेत्रे आहेत आपण अजूनही इतरांपेक्षा खूप मागे आहोत. काही मोजक्या विकसित देशापेक्षा आपण मागे आहोत. विकसनशील देश ही बिरुदावली बाजूला सारून एक विकसित देश म्हणून आपली जगाला ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी इथल्या राजकीय, सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. राजकीय महत्त्वाकांक्षी मान्यवरांनी खरतर यात महत्वाची भूमिका निभावली पाहिजे. एकीकडे वाढती लोकसंख्या आणि दुसरीकडे वाढणारी बेरोजगारी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आडकाठी आणणारे महत्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे बनले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज आपण ‘हर घर तिरंगा’ फडकवून साजरा करीत आहोत. तिरंग्याचा आम्हाला आणि सगळ्यांनाच अभिमान आहे. आमची सर्वांचीच ती एक अस्मिता आणि स्वाभिमान आहे. आपल्या तिरंग्याचा जेवढा आपल्याला अभिमान आहे तेवढाच अभिमान देशाच्या प्रगतीसाठी बाळगायला हवा. घर घर तिरंग्या प्रमाणेच घर घर रोजगार ही सुरू व्हायला हवा.
देश एक महासत्ता बनवण्याचे स्वप्न सर्वांनीच उराशी बाळगले आहे. देशाला महासत्ता बनवायचे असेल तर देशातील सर्वात तरुण पिढी आता उद्योग व्यवसायात पुढे आली पाहिजे. प्रत्येकाला त्या त्या क्षेत्रात संधी निर्माण व्हायला हवी. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
आज आपण आपल्या देशाचा स्वतंत्रता दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करताना थोर हुतात्मे, बलिदान देणारे स्वातंत्र्य चळवळीतील व्यक्तिमत्वांचा ही आदर व्हायला हवा. त्यांचे उद्देश, इच्छा आकांक्षा समजून घेऊन त्या दिशेने पावले टाकायला हवीत. देशाला स्वातंत्र्य मिळवताना त्यांच्याकडून काही चुका झाल्याचं असतील तर त्या ही समजून घेऊन भविष्यात अशा चुका होऊ नयेत असे प्रयत्न व्हायला हवेत.
त्या हुतात्यांचे स्मरण करून देशाच्या प्रति आपण सर्वच जण निष्ठा अर्पण करू या 🙏
भारतीय स्वतंत्रता दिन चिरायू होवो
जय हिंद…जय भारत