१८ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा….हजारो भाविकांची हजेरी

जेजुरी, दी २५ ( बी.एम.काळे ) तीर्थक्षेत्र जेजुरीत अत्यंत धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा मर्दानी दसरा काल जल्लोषात साजरा झाला. तब्बल १८ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वेगळीच अनुभूती देवून गेला.
नवरात्राची सांगता आणि घराघरातील घट उठल्यानंतर काल ( दि.२४) सायंकाळी ६ वाजता जेजुरीतील ग्रामस्थ, देवाचे मानकरी, खांदेकरी, तसेच सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेरून आलेल्या भाविकांनी जेजुरी गड व परिसर गर्दीने फुलून गेला होता. मानकऱ्यांच्या इशारतीने सोहळ्याला प्रारंभ झाला. भंडार्‍याच्या उधळणीत खांदेकरी मानकर्‍यानी देवाच्या उत्सव मुर्तीची पालखी उचलली, भंडार्‍याच्या उधळणीत देवाचा जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालीत पालखी बालदारीत नेण्यात आली. भांडरगृहातून देवाच्या उत्सव मूर्ती सेवेकर्‍यांनी पालखीत ठेवल्या, सोहळ्याने सीमोल्लंघणासाठी गडकोटाबाहेर बंदुकीच्या फैरींच्या सलामीत कूच केले. यावेळी गडाच्या सज्जातून भाविकांनी मुक्तहस्ताने भंडार्‍याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्ण नगरीचे स्वरूप आले होते. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडकोटाबाहेर आल्यानंतर गडाला प्रदक्षिणा घालून सोहळा रमण्याकडे निघाला. गडाच्या पाठीमागील बाजूस सोहळा विसावला. रात्री ७ च्या दरम्यान या ठिकाणी टेकडीवर व डोंगराच्या उतारावर महिला, अबालवृद्ध व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाचे मुळ ठिकाण कडेपठार मंदिरातील उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा ही सीमोल्लंघणासाठी निघाला. दोन्ही मंदिराच्यामध्ये जयाद्रीची दीड किलोमीटरची डोंगररांग असल्याने संपूर्ण डोंगरावर दोन्ही कडील विश्वस्त मंडळाकडून विजेचे तात्पुरते खांब उभे करून पुरेशा उजेडाची सोय केली होती. यामुळे संपूर्ण डोंगरावरील विद्यूत रोषणाई मनमोहक दिसत होती, दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रीच्या वेळी या सोहळ्यातील जल्लोष मर्दानी अनुभूती देत होता. यातच उत्सव मूर्तींच्या पालख्यासमोर होणार्‍या विविधरंगी शोभेच्या दारूकामामुळे तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सोहळ्याला एक ऐतिहासिक स्वरूप लाभले होते. शोभेच्या दारूकामाच्या लक्ख प्रकाशात जेजूरी गडाची पालखी डोंगर उतारावरून खाली दरीत रमण्याकडे उतरत होती, तर कडेपठार पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपने डोंगराळ भाग असल्याने खांदेकर्‍यांना पालखी सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, त्यांच्या मदतीला धावणार्‍या हातांना ही चढ उतारावर कसरत करावी लागत होती, मात्र उत्सवाचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे सारे काही सहजगत्या चालू होते, यावेळी वीरश्रीचा वेगळाच अनुभव उपस्थित भाविकांना येत होता. मर्दानी दसरा सण काय असतो याचा अनुभव भाविकांना येत होता. देहभान हरपून भाविक उत्सवाची अनुभूती घेत होते.
मद्यरात्री जेजुरी गडाचा पालखी सोहळा रमण्यात पोहोचला, तर कडेपठारचा सोहळ्याने सुसरटींगी टेकडी सर केली, रात्री दोन वाजण्याचा सुमारास प्रचंड शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीत दोन्ही सोहळ्यातील उत्सव मुर्तींची देव भेट उरकली नि सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. देवभेटीचा विलोभनीय सोहळा उरकल्यानंतर जेजुरी गडाच्या पालखीचा सीमोल्लंघांनातून सोने लुटण्याचा सोहळा रंगला. रमन्यातील तळ्याकाठी सोने लुटून भाविकांनी उत्सवमूर्तींना अर्पण करून दसर्‍याचे पारंपारिक महत्व जपले. सोहळ्याने पहाटे पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जुन्या जेजुरीमार्गे गावात प्रवेश केला. ठिकठिकानचे औक्षण स्वीकारत सोहळा मुख्य रस्त्याने गडकोटाकडे निघाला. वाटेत घराघरासमोर महिलांनी रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत केले. सकाळी ७ वाजता पालखी सोहळा गडाच्या साडे तीनशे पायर्‍यांची चढण चढून गडावर पोहोचला. सोहळ्यासमोरील सनई चौघडा, धनगरी ओव्या, सुंभरान, लोककलावंतांची भक्तीगीते, लावण्या, देवाची गाणी व नृत्य होत असल्याने विजयी उन्माद चांगलाच जाणवत होता. भंडारगृहात उत्सव मूर्ती विसावल्यानंतर पेशव्यांनी रोजमारा वाटप केले सोहळ्याची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page