० ते २० विद्यार्थ्यांच्या ‘शाळा बंद’ करु नयेत;अन्यथा पालकांसह आंदोलनाचा इशारा.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा इशारा

जेजुरी, दि.११ (प्रतिनिधी ).राज्यातील ० ते २० विद्यार्थी असणाऱ्या ‘शाळा बंद’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
या संदर्भात कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री,यांच्याकडे या शाळा बंद करु नये.अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र व प्राथमिक शिक्षण संचालक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सुचनांनुसार शिक्षणावरील व पद भरतीवरील खर्च कमी करण्यासाठी शासनाने ० ते २० पट असणाऱ्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे .यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होणार आहे.शिक्षण हक्क कायद्यान्वये शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यात आले आहे .यामुळे विद्यार्थी तेथे शाळा,१ कि‌मी.परिसरात प्राथमिक शाळा यानुसार वाडी,वस्ती,पाडे,दुर्गम,डोंगराळ आदिवासी बहुल क्षेत्रात शिक्षणाची व्यवस्था निर्माण झाली आहे.वयोगट ६ ते १४ पर्यंत मुलामुलींना,दिव्यांग विद्यार्थ्यांना संविधानीक हक्कानुसार व शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळत आहे.मोफत व सक्तीचे शिक्षण देणे सरकारवर बंधनकारक आहे.मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश ,शालेय पोषण आहार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची सुरुवात झाली आहे. गुणवत्तेमध्ये कित्येक पटीने वाढ होत आहे.
परंतु अचानक शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाठी घेतलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय वरील नमूद सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहापासून दूर करणारा आहे.इतर राज्यात शिक्षणासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा केल्याची उदाहरणे समोर येत आहेत मात्र महाराष्ट्र राज्य शासनाने गोरगरीब,वंचितांच्या हक्काचे शिक्षण देत असणाऱ्या शाळाच बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होणार आहे.या संदर्भात समाजात संतप्त प्रतिक्रियाआहेत.पालकवर्गात नाराजीचे सूर आहेत . ‘माझी शाळा बंद झाल्यावर आम्ही शिकायचे कुठे असा प्रश्न दुर्गम ,डोंगराळ,आदिवासी बहुल क्षेत्रातील विद्यार्थी विचारु लागले आहेत.
त्यामुळे ० ते २० पट असणाऱ्या शाळा बंद करण्यासंदर्भात शासनानी पुनर्विचार करावा अन्यथा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.असा इशारा कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे,विठ्ठल सावंत,चंद्रकांत सलवदे,दिगंबर काळे,दादासाहेब डाळिंबे,संतोष ससाने,विनोद चव्हाण,मिलिंद देटगे, सुहास मोरे यांनी राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page