हिमालयाला गवसणी घालणारे उत्तुंग नेतृत्व – प्रा. नंदकुमार सागर
जेजुरी, दि.१५ हिमालयाला ही गवसणी घालणारे एक उत्तुंग नेतृत या महाराष्ट्रात जन्माला आले. आजच्या राजकारण्यांना, समाजकारण्यांना एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून जगभर शरद पवारांना सन्मान मिळत आहे. असे प्रतिपादन जिजामाता हायस्कुल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी नाझरे क.प. येथे केले.
शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाझरे क.प. येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालयात दि.१२ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान अभिष्टचिंतन आणि कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृतज्ञता सप्ताहाचा शुभारंभ प्रा.नंदकुमार सागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. वृक्षदिंडी काढून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून काम केले. या शिवाय त्यांना शासकीय अनेक संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे सर्वसामान्यांशी जोडलेले नाते कायमच अबाधित राहिल्याने त्यांचे कार्य आजच नव्हे तर पिढयानपिढ्या सर्वानाच दिपस्तंभा सारखे मार्गदर्शक ठरणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे आदींची भाषणे झाली.
यावेळी नाझरे क.प.ग्रामपंचायत सदस्य सचिन नाझीरकर, माजी सरपंच शिवाजी नाझीरकर, विनायक वायसे, सोसायटीचे चेअरमन जालिंदर वायसे,स्कुल कमिटीचे नितीन नाझीरकर सोसायटीचे उपाध्यक्ष शहाजी नाझीरकर, सतीश खैरे, माऊली नाझीरकर, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.देठे, शिक्षक एस.डी. निकुम, सौ क्षीरसागर, के.बी.रोटे, दि.बी.गावडे, आबा नाझीरकर, नरसिंग नाझीरकर ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक नितीन नाझीरकर यांनी केले. सूत्रसंचालन डी. के.भावसार यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री देठे यांनी मानले.