हिंदी भाषेशिवाय भारत आणि भारतीयता अधुरी आहे- प्रा.संतोष तांबे शरदचंद्रजी पवार महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस संपन्न
जेजुरी, दि.१८ केवळ साहित्याच्या दृष्टिकोनातून हिंदी भाषेकडे पाहू नका. भाषा ही संस्कृतीची संवाहक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला जोडणारी, लोकांच्या हृदयाची वाणी आहे हिंदी.जनसामान्यांच्या मनामध्ये हिंदी भाषेने आपले स्थान निर्माण केले. देशाला एकसंध ठेवायचे काम हिंदी भाषा करीत आहे. हिंदी भाषेशिवाय भारत आणि भारतीयता अधुरी आहे. असे उद्गार प्राध्यापक संतोष तांबे यांनी काढले.
जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्रा. धनाजी नागणे होते. हिंदी दिनाच्या निमित्ताने “राष्ट्रीय एवं आंतरराष्ट्रीय स्तर पर हिंदी का महत्व” या विषयावर ते बोलत होते. पुढे ते म्हणाले आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रभाव आहे, कारण भारतीय लोक विदेशात जाऊन तेथेच स्थिरावले आहेत. सिंगापूर, थायलंड, जपान, ब्रिटन, जर्मनी, श्रीलंका, मॉरिशस या जवळजवळ १५३ देशात हिंदी बोलली जाते. दुबई सारख्या देशात अधिकांश लोकांना हिंदी समजते व लोक हिंदी भाषा बोलतात. विदेशात हिंदी सिनेमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. यातून हिंदी भाषेमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हिंदी दिनाचे औवचित्य साधून महाविद्यालयात वक्तृत्व, निबंध व काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ. राजकुमार रिकामे,प्रा. संगीता पवार व प्रा. किशोरी ताकवले यांनी काम पाहिले.
या स्पर्धेतील विजेते वक्तृत्व- प्रथम: ज्योती चोरगे, द्वितीय: प्रियंका कळेकर, तृतीय: कोमल झगडे.
निबंध स्पर्धा प्रथम: धनश्री कुदळे, द्वितीय: ज्ञानेश्वरी पवार, तृतीय: अपर्णा मोहरकर व सिद्धी चोरगे.
काव्यवाचन स्पर्धा प्रथम: सौरभ कुचेकर, द्वितीय: कोमल झगडे, तृतीय: अश्विनी सोनवले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वरी पवार, ज्योती चोरगे, सौरभ कुचेकर, हर्षल पाटील, जयदीप यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. बेबी कोलते यांनी केले. परिचय प्रा. संगीता पवार, सूत्रसंचालन सना मुंडे व आभार अश्विनी सोनवणे हिने मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.