गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल…समजून घेण्यासाठी आलोय- राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील ‘भारत जोडो’ यात्रा काल (७ नोव्हेंबर) रात्री देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं आणि छोटेखानी भाषण केलं. दक्षिण भारतात राहुल गांधींच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.
आज (८ नोव्हेंबर) वन्नाळी गुरुद्वारा इथून राहुल गांधींनी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पदयात्रा सुरू केली. ते वझरगा इथं आता पोहोचले असून, दुपारी ४ वाजता ते पुन्हा यात्रेला सुरुवात करतील आणि शंकरनगर रामतीर्थ इथं पोहोचतील. तिथेच त्यांचा आजच्या रात्रीचा मुक्काम असेल.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री साडेनऊ वाजता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
राहुल यांना पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
लोकांचं दुःख समजून घेण्यासाठी आलोय, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल, असं राहुल यांनी सांगितलं.
शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर राहुल यावेळी बोलले. त्यांचं भाषण जवळपास पाच मिनिटे चाललं.
माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील या यात्रीत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा अशा पाच जिल्ह्यातून ३८४ किलोमीटरचा प्रवास या यात्रेदरम्यान राहुल गांधी करणार आहेत. या काळात दोन मोठ्या सभा सुद्धा होणार आहेत.
राज्यभरातून कार्यकर्ते राहुल गांधींना साथ देण्यासाठी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे यात्रामार्गावरील सर्व हॉटेल, मंगल कार्यालयं कार्यकर्त्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आली आहे
राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील मार्गावर ज्या दोन मोठ्या सभा होणार आहेत, त्यातील पहिली सभा १० नोव्हेंबरला नांदेडमध्ये होईल, तर दुसरी सभा १८ नोव्हेंबरला शेगावात होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींचं महाराष्ट्रात स्वागत करतील, अशी यापूर्वी माहिती देण्यात आली होती. मात्र, शरद पवार हे सध्या ब्रिच कँडी रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते यात्रेच्या स्वागतासाठी जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीय. तसंच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यात्रेत सहभागी होणार का, याबाबतही निश्चित नाही. मात्र, शिवसैनिक सहभागी होतील, हे उद्धव ठाकरेंनी काल (६ नोव्हेंबर) स्पष्ट केलं.
देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग सात ते १२ नोव्हेंबर पाच दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली आहे. नांदेडमधील जवळपास नऊ मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे.
यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात तैनात केला जाणार आहे.
ऐतिहासिक संदर्भ
देशामध्ये पदयात्रांना एक ऐतिहासिक संदर्भ आहे. जनतेमध्ये पोहोचण्याचे माध्यम म्हणून पदयात्रांकडे पाहिले जाते.
१९८३ मध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते चंद्रशेखर यांनी सहा महिने यात्रा काढली होती. ही यात्रा ४००० किमीची होती.
चंद्रशेखर हेच तळागाळातून आलेले नेते आहेत हे त्यांना सिद्ध करायचं होतं. तेव्हा ते ५६ वर्षांचे होते आणि त्यांना मॅराथॉन मॅन म्हणत असत. या यात्रेमुळे त्यांना कोणताही राजकीय फायदा झाला नाही.
पुढच्या वर्षी इंदिरा गांधींची हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली.
१९९० मध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही असीच रथयात्रा काढली होती. एका छोट्या ट्रकमध्ये १० हजार किमीची यात्रा काढण्याचा त्यांचा इरादा होता.
सोमनाथ ते अयोध्या ही यात्रा होती. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी ही रथयात्रा होती.
मात्र एका महिन्यातच अडवाणींची यात्रा मध्येच थांबवण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते. त्यांची ही यात्रा भाजपाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी होती.
अशा प्रकारच्या यात्रांना ऐतिहासिक संदर्भ आहे. १९३० मध्ये महात्मा गांधीनीही अशीच पदयात्रा काढली होती. ही यात्रा ३८० किमीची होती.
ही पदयात्रा गांधीजी पूर्ण करू शकतील की नाही अशी शंका होती. मात्र गांधींनी ती पूर्ण केली होती.
चीनचे सर्वोच्च नेते माओंनी १२००० किमी ची यात्रा काढली. ही यात्रा १९३४ मध्ये काढली होती. ही यात्रा म्हणजे चीन च्या निर्मितीसाठीचं नवं पाऊल होतं.
“सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत नेत्यांकडे विश्वासार्हता नाही तोपर्यंत अशा यात्रा यशस्वी होत नाहीत.”