स्रिया पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध करू शकतात….शरद पवार

पुणे, दि. ३ लहान वयातच मुला- मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. त्यामुळे नवनवीन विषय घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले पाहिजे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया कर्तृत्व दाखवू शकतात असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रयत शिक्षण संस्था पश्चिम विभाग पुणे आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरद रयत चषक आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील उपस्थित होते.

स्त्रियांना संधी देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे जर रयतेमध्ये घडले तर ते सामान्य कुटुंबापर्यंत जाईल. रयतेमध्ये हे घडवायची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळात ऑनलाइन राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. निबंध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगावमधील इयत्ता दहावीतील आविष्कार रमेश वैरागर याचा प्रथम क्रमांक आला. महाविद्यालयीन स्तरावरील या स्पर्धेत प्रथम फेरीत महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतून ६७० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये मुलींचा सहभाग ७५ टक्के एवढा उल्लेखनीय होता. प्रथम फेरीतून सुपर ८१ स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत ३६ जिल्ह्यातील मुला- मुलींनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेत शरद रयत चषकाचा मानकरी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींचा संघ ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page