सोमवारी जेजुरीत भर सोमवती यात्रा यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांची बैठक संपन्न….
जेजुरी, दि १४ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा सोमवती यात्रा सोहळा सोमवार दि २० रोजी होणार आहे. सोमवार दि २० रोजी सकाळी ७ गडावरून श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हास्नानासाठी नदीकडे मार्गस्थ होवून दुपारी बारा वाजण्याच्या आत उत्सवमूर्तींना कऱ्हास्नान घातले जाणार असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत देवाचे इनामदार राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.
सोमवार दि १३ रोजी सोमवती यात्रा व महाशिवरात्र उत्सवाच्या नियोजना निमित्त जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात पालखी सोहळा सामिती व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. यावेळी पालखी सोहळ्याचे मानकरी राजेंद्र पेशवे, श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे,माजी अध्यक्ष गणेश आगलावे,पदाधिकारी अरुण खोमणे, छ्बन कुदळे,पंडित हरपळे ,सुशील राउत, दीपक राउत, तसेच श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप,पंकज निकुडे,सुधीर गोडसे, नितीन राउत, संदीप घोणे, देवसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप,व्यवस्थापक सतीश घाडगे , माजी नगरसेवक हेमंत सोनवणे,अजिंक्य देशमुख,जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर व मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.
सोमवार दि २० रोजी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत अमावस्या असल्याने कऱ्हास्नानासाठी जेजुरी गडावरून श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा सकाळी सात वाजता जेजुरी गडावरून निघणार असून दुपारी बाराच्या आत मध्ये कऱ्हानदीवर देव अंघोळीचा विधी होणार आहे. या धार्मिक विधी नंतर हा पालखी सोहळा जेजुरीत ग्रामदैवता जानाई मंदिरा समोर रात्री आठ वाजे पर्यंत विसवणार असून रात्री आठ नंतर हा पालखी सोहळा श्री खंडोबा मंदिराकडे मार्गस्थ होणार असल्याचे श्री पेशवे यांनी सांगितले.
सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कऱ्हानदी कडे जाणार्या रस्त्याची डागडुजी,भाविकांना अल्पोपहार, पापनाश तीर्थावर मंडप,जानाईदेवी मंदिरासमोर मंडप आदी सुविधा उपलब्ध करण्यात असून दि १८ रोजी महाशिवरात्र उत्सवासाठी हि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सांगितले.
शनिवार व रविवारी महाशिवरात्र उत्सव व सोमवार दि २० रोजी सोमवती यात्रा असून या तीन दिवसात जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी होणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी भाविकांनी दागदागिने,मौल्यवान वस्तू बरोबर आणू नयेत असे आवाहन जेजुरी देवसंस्थानचे व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी सांगितले.
जेजुरी गडावरील पायरी मार्गावर पुन्हा अतिक्रमणे वाढली असून त्यामुळे भाविकांना गडावर ये जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. देवसंस्थानने याकडे लक्ष घालावे अशी मागणी या बैठकीत ग्रामस्थांनी केली .