सोमवती यात्रेतील जखमींचा उपचाराचा देवसंस्थानच्या वतीने खर्च….
जेजुरी दि १६ सोमवती यात्रेत पालखी सोहळा गडावरून खाली येत असताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत जखमी झालेल्या मानकरी घडशी समाजाच्या पाच व्यक्तींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या उपचारासाठी आलेला खर्च श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने देण्यात आला.
सोमवती यात्रेदिवशी जेजुरी गडावरून श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ होताना प्रचंड गर्दी मुळे चेंगराचेंगरी होवून देवाचे मानकरी असणारे घडशी समाजाचे पाच जण वाजंत्री जखमी झाले होते. पाच जखमींवर जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. देवसंस्थानच्या कार्यालयात तहसीलदार व पदसिद्ध विश्वस्त विक्रम राजपूत यांच्या हस्ते हा धनादेश आनंदी हॉस्पिटलचे डॉ. सुमित काकडे यांना देण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे,विश्वस्त मंगेश घोणे,डॉ राजेंद्र खेडेकर,अखिल मंडई गणपती ट्रस्टचे कार्याध्यक्ष बोलानाथ वांजळे, माजी विश्वस्त नितीन राउत सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर परिवाराच्या वतीने श्रीश व दर्श यांच्या हस्ते जेजुरी गडावर येणारी दिव्यांग भाविकांसाठी मंदिराभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी व्हीलचेअर देण्यात आली. तसेच जेजुरी गडावर देशी झाडे लावण्यात आली. श्री खंडोबा मंदिरात होणाऱ्या नित्य पूजेसाठी महिना चार हजार रुपये देण्यात आले.