सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे निधन
पुणे, दि.८ वृक्षलागवडीचा प्रोत्साहन देणारे, वृक्षप्रेमी सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुभाषचंद्र डांगे यांचे रविवारी रात्री ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
मुळचे वाईचे असणारे आणि वृक्ष लागवडीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सुभाषचंद्र डांगे हे १९७८ मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते पुणेकर झाले. सुभाषचंद्र डांगे यांचे थोरले भाऊ हे ही पोलीस सेवेत होते. त्यांच्या वडिलांचेही वाईमध्ये मोठे सामाजिक कार्य आहे. त्यांचाच वारसा सुभाषचंद्र डांगे यांनी पुढे चालविला. ज्या ठिकाणी त्यांची नेमणूक होत असे, त्याठिकाणचा परिसर हिरवागार करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यांची सांगली येथे पोलीस निरीक्षक म्हणून कारकीर्द चांगलीच गाजली होती.
पुणे शहरात त्यांनी खडकी व स्वारगेट सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम केले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते.