सूर्याजी पिसाळानंतर थोर गद्दार रामराजेंचेच नाव घ्यावे लागेल – आ जयकुमार गोरे
स्वतःच्या पक्षाशी, वरिष्ठ नेत्यांशी, सातारा जिल्ह्याशी आणि इथल्या जनतेशी आयुष्यभर बेईमानी करणारे रामराजे नाईक निंबाळकर सुर्याजी पिसाळांनंतरचे सर्वात थोर गद्दार आहेत.
ज्या पक्षाने भरभरुन दिले त्या पक्षाशी आणि त्या पक्षाच्या प्रमुखांशी बेईमानी करायला कधीच मागेपुढे न पाहणार्या रामराजेंची इतिहासात गद्दार म्हणून नक्कीच नोंद होईल, असा टोला आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
वाजपेयी यांच्यानंतर भाजपमध्ये आ. जयकुमार गोरे थोर नेते आहेत, अशी टीका आ. रामराजे यांनी केली होती. त्याविषयी बोलताना आ. गोरे म्हणाले, छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्वराज्याशी बेईमानी करणारे काही गद्दार होवून गेले. त्यात सुर्याजी पिसाळांचे नाव सर्वात अगोदर घेतले जाते. यापुढे सुर्याजी पिसाळांनंतर आ. रामराजे यांचे नाव थोर गद्दार म्हणून घेतले जाईल. रामराजे आजपर्यंत पडद्यामागून खेळ्या आणि गेमाच करत आले आहेत. मदत करणार्यांचा काटा काढण्यात ते पटाईत आहेत. जिल्ह्यात स्वपक्षाच्याच आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील आणि इतर अनेकांचे काटे काढण्यात रामराजेंनी कधी मागेपुढे पाहिले नाही. ज्या पक्षाने त्यांना भरभरुन दिले त्या पक्षाशी सोयीनुसार गद्दारी करायला ते सर्वात पुढे असतात. राष्ट्रवादीत असूनही ते अजित दादांना विरोध करतात.
जिल्हा बँकेत बसून खुशामतगार चार चौघांबरोबर बसून षडयंत्रे रचण्यात राजे वाकबगार आहेत. त्यांनी आजपर्यंत जिल्ह्याशी, इथल्या मातीशी आणि जनतेशी कायम गद्दारीच केली आहे. त्याबाबतीत त्यांचा कुणीच हात धरु शकणार नाही. माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांबाबत त्यांच्या मनात नेहमीच आकस राहिला आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागाला पाणी देता येणार नाही, असे हेच महाभाग नेहमी म्हणायचे. माण, खटावला पाणी मिळू नये म्हणून प्रयत्न करणारे रामराजे निवडणुका आल्या की माण, खटावात राजकारणाचा बाजार मांडतात, असेही आ. गोरे म्हणाले.
म्हसवड एमआयडीसी कोरेगावला नेण्याचे प्रयत्न रामराजेंनीच केले. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा तो डाव मी यशस्वी होवू देणार नाही. आजपर्यंत त्यांनी माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचून मला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या पाठबळाच्या जोरावर मी त्यांची षडयंत्रे यशस्वी होवू दिली नाहीत, असेही ते म्हणाले.
पडद्याआडच्या कारनाम्यांची पोलखोल एकदा करावीच लागेल
जिल्ह्यातील काही नेते स्वच्छ राजकारण, समाजकारणाची झूल पांघरुन जनतेची दिशाभूल करत आले आहेत. मात्र हेच नेते प्रत्यक्षात पडद्याआडून काय आणि कोणते कारनामे करतात याची पोलखोल लवकरच करणार आहे. जिल्हा बँकेत बसून काय चालते हेही एकदा जनतेसमोर मांडावे लागणार असल्याचे आ. गोरे यांनी सांगितले.