सासवडला १६ डिसेंबर पासून संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन….
मार्गशीर्ष वद्य तृतीया बुधवार २१ डिसेंबर हा संत सोपानदेव समाधी सोहळ्याचा प्रमुख दिवस …
सासवड दि. १५ ( प्रतिनिधी )
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या क्षेत्र सासवड येथील मंदिरात संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ होत असून शुक्रवार १६ ते शुक्रवार २३ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा रंगणार आहे. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून दिंड्यांचे आगमन होणार असून मंदिर आणि परिसरात भजन, कीर्तन, हरिनामाचा जागर राहणार आहे. शुक्रवार दि. १६ डिसेंबर रोजी पहाटे काकडा आरती आणि अभिषेक व महापूजा झाल्यानंतर हभप संभाजी महाराज बडदे ( कोडीत ) यांच्या कीर्तनाने या सोहळ्यास प्रारंभ होईल. दुपारी विजय महाराज भिसे यांचे प्रवचन तर रात्री हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. अशी माहिती संत सोपानदेव महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली आहे.
शनिवार १७ रोजी सकाळी परशुराम काळे ( काळेवाडी ) यांचे तर सायंकाळी सोपानराव वाईकर यांचे प्रवचन होईल. रात्री परकाळे दिंडीचे कीर्तन होईल. रविवार १८ रोजी सकाळी ९वा. राजाराम महाराज कामठे ( कुंभारवळण ) यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ५ ते ६ हरेयनम संस्थान, सोलापूर यांचे प्रवचन होईल. रात्री ८ वा. बंडा महाराज कराडकर यांचे कीर्तन होईल. सोमवार १९ रोजी पहाटे सोपानदेव समाधीस पवमान अभिषेक होईल. सकाळी ६ वा.सोपान वाईकर यांचे तर ९ ते ११ गेनबा पवार यांचे कीर्तन होईल. ११ वा. हरिपाठ तर दुपारी ४ वा. नगरप्रदक्षिणा होईल. सायंकाळी ६ नंतर राज्यभरातून येणाऱ्या दिंडी प्रमुखांचा सत्कार होईल. रात्री ९ ते ११ हरीबाबा दिंडीतर्फे कीर्तन होईल. मंगळवार २० रोजी सकाळी ९ वा दिवे पंचक्रोशीतील कातोबा नाथ दिंडीचे वतीने कीर्तन होईल. दुपारी १२ वा. सुनील फडतरे ( बोपगाव ) यांचे कीर्तन होईल. तर ३ ते ६ चक्री प्रवचन होईल. रात्री ८ ते १० बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होईल.
मार्गशीर्ष वद्य तृतीया बुधवार २१ डिसेंबर हा संत सोपानदेव समाधी सोहळ्याचा प्रमुख दिवस असून सकाळी ९ ते ११ या वेळात संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज हभप केशव महाराज नामदास ( पंढरपूर ) यांचे संत सोपानदेव समाधीचे कीर्तन होईल. दुपारी १ वा. पुरंदर तालुक्यातील नवी मुंबईस्थित रहिवासी असलेल्या अंजीर मंडळाकडून महाप्रसाद देण्यात येईल. दुपारी ३ वा. सत्यवती एदलाबादकर यांचे प्रवचन, सायंकाळी महिन्याचे वारकरी संत नामदेव महाराज यांनी रचलेल्या सोपान महाराजांच्या समाधी वर्णनाचे अभंग होवून मंदिर प्रदक्षिणा होईल.
गुरुवार २२ रोजी सकाळी १० वा. माऊली रथापुढील क्र. १४ बोफळे दिंडीच्या वतीने काल्याचे कीर्तन, दहीहंडी व दिंडी प्रदक्षिणा होईल. सायंकाळी ५. वा. प्रवचन, ६ वा. भजन व हरिपाठ तर रात्री रोकडोबा दादा दिंडीचा जागर होईल. तसेच शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी ९. वा. हभप म्हस्कुजी महाराज कामठे यांचे कीर्तन होवून ११.३० वा. वारकऱ्यांच्या वतीने सोपानदेव समाधीस गरम पाण्याने प्रक्षाळ पूजा घालण्यात येईल. रात्री ८. वा. काढ्याचे कीर्तन होवून संत सोपानदेव समाधी सोहळ्याची सांगता होईल.