सासवडचा आशिष मस्के विक्री कर निरीक्षकपदी..
सासवड दि.२९ ( प्रतिनिधी ) : येथील बी. ई. मेकॅनिकल झालेला तरुण आशिष हनुमंत मस्के हा तरुण सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजेच विक्री कर निरीक्षक या पदावर निवडला गेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून त्याला हे यश मिळाले आहे.
माळशिरस (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील मुळगाव असलेला हा तरुण आई श्रीमती कल्पना मस्के या सासवड येथील वाघेरे महाविद्यालयात सेवक म्हणून असल्यामुळे सासवडला स्थायिक आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण माळशिरस येथे झाले. माध्यमिक शिक्षण नवोदय आणि वाघिरे विद्यालय, सासवड येथे झाले. पुरंदर शैक्षणिक संकुलात अकरावी – बारावी सायन्स चे शिक्षण पूर्ण केले. तर बी.ई. पदवी वाघोली येथील मोझे महाविद्यालयात पूर्ण केली. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुढील प्रथम श्रेणीची परीक्षा उत्तीर्ण करण्याची संधी घेण्याचा मनोदयही त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.