साकुर्डे येथे साहिवाल गाईंचे मोफत प्रत्यारोपण
साहिवाल गायी शेतकऱ्यांच्या फायद्याच्या…
जेजुरी, दि.५ साकुर्डे ता. पुरंदर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच विभागीय विस्तार केंद्रामार्फत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शुद्ध जातिवंत वंशावळीच्या साहिवाल गाईंचे संकरित गाईमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले.
यावेळी केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने यांनी भारतामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गायी उपलब्ध होण्यासाठी संकरित गाईंच्या गर्भाचा वापर करण्यात येणार आहे. भारतात देशी गायींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. बदलत्या हवामानात तग धरण्याची क्षमता तसेच दूध देण्याचे सातत्य यामुळे साहिवाल जातीची निवड करण्यात आली आहे. ही जात उत्तर भारतात दुधासाठी प्रसिद्ध असून १ डिग्री सेल्सिअस तापमानात तग क्षमता या गाईत आहे. गेल्या सात वर्षांच्या संशोधनातून शेतकऱ्यांकडे असणाऱ्या संकरित गाई किंबा गावठी गाईपासून भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जातिवंत देशी दुधाळ गायींची निर्मिती वेगाने शक्य आहे. सद्या या संशोधन केंद्रातून साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल शिंधी तसेच खिल्लार गायींवर तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शुद्ध जातिवंत देशी दुधाळ गाई आपल्याच दारात तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष सुरेश सस्ते यांनी यावेळी केले.
यावेळी साकुर्डे येथे १४ गायींना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्फत मोफत भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. भ्रूण प्रत्यारोपणासाठी साधारणपणे २५ ते ३० हजार रुपये खर्च येत आहे. हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत कुमार पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, प्रकल्पाचे तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कंखरे, डॉ. प्रमोद साखरे यांच्या मार्गदर्शखाली सुरू असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली.
यावेळी सुरेश सस्ते, डॉ. विनोद पाटील, डॉ. विलास पठाडे, डॉ. वेदपठाक, आदी मान्यवर व दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.