सत्तारूढ आघाडीत वाद, रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ घसरली, म्हणाले’ “हरामखोराची अवलाद….
राज्यातील सत्तारूढ आघाडीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू चांगलेच संतापल्याचे दिसून आले आहे. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया..” असे म्हणत रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आणि त्यांनी… “अबे हरामखोराची औलाद, आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. आमच्यामुळेच तू मंत्रीपदाकडे डोळे लावून बसला आहे.”, अशा शब्दात बच्चू कडूंनी राणांवर शाब्दिक हल्ला चढवला. “आम्ही नाचणारे नाही, तर नाचवणारे आहोत.”, अशी टीका देखील बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.
बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघात दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. “मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिपाई आहे. बच्चू कडू म्हणजे सबसे बडा रुपया आहे.”, असे म्हणत राणांनी बच्चू कडू यांच्यावर तोंडसुख घेतले होते. त्यावर बच्चू कडू यांनी लगेच प्रतिक्रिया देणे टाळले होते, पण आता अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे बच्चू कडू यांनी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे
अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, तर रवी राणा हे भाजपचे समर्थक आहेत. उभय आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सत्तारूढ आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.