सख्ख्ये भाऊ पक्के वैरी, मोठ्याने केला लहान भावाचा खून..
दारू पिऊन सतत त्रास द्यायचा
पुणे : दारू पिऊन त्रास देत असल्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून खून केला. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगरमधील माउली निवास येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. तेजस यशवंत भोसले (वय २५) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी आकाश यशवंत भोसले (वय २९, रा. टिळेकरनगर कोंढवा) याला अटक केली आहे. याबाबत आई सुनीता यशवंत भोसले (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, आकाश व तेजस हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तेजस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याला दारूचे व्यसन आहे. दारू पिल्यानंतर तो घरातल्या लोकांना शिवीगाळ करत असे. त्यामुळे आकाश हा त्याच्यापासून दुसरीकडे वेगळा राहत होता. शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला होता. घरातील लोकांना तो शिवीगाळ करून मारहाण करू लागला. त्याच्या आईने ही माहिती आकाश याला दिली. आकाश तेथे आला होता. त्यावेळी दोघांत वाद झाला. आकाश याने तेजसला मारहाण करून रागाच्या भरात त्याचा गळा दाबून ढकलून दिले. त्यांना वाटले दारू पिल्यामुळे तो पडला आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. सकाळी तेजस याला घरच्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.