संभाजी भिडे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, पृथ्वीराज चव्हाण यांना फोन व मेलवरून धमकी.सातारा पोलीस अलर्ट
सातारा, दि.२९ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना आज फोनद्वारे तसेच मेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी योग्य कारवाई करू, असे म्हटले होते.
यावेळी आमदार चव्हाण यांनी म्हटले होते की, “संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रपित्याबद्दल निंदापूर्वक वक्तव्य केले आहे. अशाप्रकारे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. हा माणूस हे काम आज करत नाही, तर गेल्या अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. आता त्यांच्या या वक्तव्याची त्वरित दखल घेण्यात यावी. जर संभाजी भिडे हा व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल अशाप्रकारचं विधान करत असेल तर तो बाहेर कसा फिरू शकतो? असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाण सभागृहात आक्रमक झाले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील पृथ्वीराज बाबांच्या या मागणीची दखल घेऊन, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू” असे आश्वासन दिले आहे. परंतु एरवी शांत, संयमी असणारे पृथ्वीराज चव्हाण प्रथमच भिडे प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञातांकडून फोन तसेच मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे