शेतकऱ्यांचे ५ कोटी ७८ लाख थकवलेभीमा पाटस साखर कारखाना साहित्य जप्तीचे आदेश…………..… आ.राहुल कुल अडचणीत ?
पुणे, दि.२५ ( प्रतिनिधी ) भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवले असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारीनंतर आता साखर आयुक्तांनी भीमा पाटस साखर कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत.दौंडचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भीमा पाटस साखर कारखान्याचा विषय चर्चेला आला होता.
या साखर कारखान्यात ज्या शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस आणला होता, त्यांनी आमचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
दरम्यान, यामधील काही शेतकऱ्यांनी साखर आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती. आमचे पैसे तातडीने मिळवून द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. दरम्यान, साखर आयुक्तांनी यासंदर्भात भीमा पाटस साखर कारखान्याला नोटीस पाठवली होती.
शेतकऱ्यांच्या या तक्रारीबाबत तातडीने खुलासा करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार? याबाबत तातडीने उत्तर द्यावं, अशी विचारणा नोटीशीमध्ये करण्यात आली होती. मात्र, याबाबत साखर कारखान्याकडून कुठलीही योग्य कारवाई करण्यात आली नाही. तसेच शेतकऱ्यांचे पैसे देखील परत केले नसल्याची माहिती आहे.
यानंतर आता साखर आयुक्तांनी यासंदर्भात कडक कारवाई करत भीमा पाटस साखर कारखान्यातील असलेल्या साहित्याच्या जप्तीचे आदेश दिलेले आहेत. या जप्तीच्या साहित्यातून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहे, एकंदरीत भाजप आमदार राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.