शेतकऱ्यांचे नुकसान करून विमानतळ करू पाहणाऱ्यांच्या घरी वेळ आल्यास काळे झेंडे लावू.- आमदार संजय जगताप

विमानतळ विरोधी संघर्ष समितीचा यल्गार….आंतरराष्ट्रीय विमानतळास आमचा विरोधच ..

सासवड दि. ११ (प्रतिनिधी ) विमानतळ विरोधी संघर्ष समितीने आंतरराष्ट्रीय विमानतळास विरोध दर्शविण्यासाठी पारगांव मेमाणे ता.पुरंदर येथील पारेश्वर मंदिरामध्ये पारगांव,कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वनपुरी व उदाचीवाडी या गावातील शेतकऱ्यांनी सभा घेऊन विमानतळा ला जागा द्यायचीच नाही अशी भुमिका घेतली.

 यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास विद्यमान सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू शासनाकडून वारंवार बातम्या पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. विमानतळ हे ठराविक व्यक्तींच्या स्वार्थासाठी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. विमानतळाला या सात गावातील जागा योग्य नाही याचा अहवाल यापूर्वी शासना समोर मांडला आहे.सरकार बदलले आणि पुन्हा आता याठिकाणी विमानतळा साठी प्रयत्न चालू झाले आहेत. मात्र या विमानतळ विरोधाच्या लढ्यात मी एक विमानतळ विरोधाचा सैनिक म्हणुन या सर्व शेतकऱ्यांसोबत आहे. आपली शेती ही आपल्याला शाश्वत उत्पन्न देणारी आहे. पैसा हा कायम रहात नसतो त्यामुळे तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी देखील अशीच एकी ठेवा, माझ्या पुरंदर च्या शेतकऱ्यांचे नुकसान करून असा कोणताच प्रकल्प झाला नाही पाहिजे.शेतकऱ्यांचे नुकसान करून विमानतळ करू पाहणाऱ्यांच्या घरी वेळ आल्यास काळे झेंडे लावण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. अनेक शेतकऱ्यांनी विमानतळ विरोधी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जि.प.सदस्य दत्तात्रय झुरंगे ,माऊली यादव, गौरव कोलते, पारगांव च्या माजी सरपंच प्रियंका मेमाणे,उपसरपंच चेतन मेमाणे, कुंभारवळण चे माजी सरपंच अमोल कामठे, वनपुरी चे सरपंच नामदेव कुंभारकर, उदाचिवाडी चे सरपंच संतोष कुंभारकर,खानवडी च्या सरपंच स्वप्नाली होले, उपसरपंच स्वप्निल होले एखतपूर मुंजवडी चे कृष्णा झुरंगे.शिवाजी कोलते,संतोष हगवणे, जितेंद्र मेमाणे,देविदास कामठे, विठ्ठल मेमाणे, सर्जेराव मेमाणे, लक्ष्मण गायकवाड आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरंदर विमानतळ विरोधाचा लढा आपण गेली सहा वर्षे लढतोय आणि त्यात आपल्याला नक्की यश येणार आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याचा या प्रकल्पला विरोध आहे आणि तो कायम असेल. वेळ आल्यास पुन्हा आंदोलन केली जातील कायदेशीर लढा देखील दिला जाईल. विमानतळासाठी याठिकाणी जमीन मिळणार नाही असे विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ताशेठ झुरंगे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page