शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल – आयुक्त शैलजा दराडे
पुणे दि.२१ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परिक्षेच्या इयत्तानिहाय तसेच पेपरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येणार आहे.
उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.