शिवसेना दसरा मेळाव्यासाठी तयार….अभूतपूर्व आयोजनाची तयारी, दीड लाखांवर शिवसैनिक हजेरी लावणार..
मुंबई, दि.२८ ( प्रतिनिधी) ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर शिवाजी पार्क ) ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे.
दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी चौक, राजा बढे चौक, सावरकर मार्ग, – सिद्धीविनायक मार्ग इथे गेट उभारले जाणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.
परिसर भगवामय होणार
दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्याची जबाबदारी शाखा स्तरावर दिली जाणार आहे. विशाखा राऊत, महेश सावंत यांच्यावर दादर-शिवाजी पार्क संदर्भातील सर्व परवानग्या घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स सेवा, वॉटर टँकर, शौचालये, अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेकडून कडूनही शिवसेनेला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी
शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीची लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर शिवसेनेला अखेर मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार 2 ते 6 ऑक्टोबर अशा पाच दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिक आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेने 20 हजार रुपये अनामत रक्कम आणि 1475 रुपये भाडे भरुन दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे.
दोन्ही गटांकडून कार्यकर्त्यांची गर्दी खेचण्याचा प्रयत्न
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यानंतर ठाकरे गट शिवाजी पार्क तर शिंदे गट बीकेसी एमएमआरडीए मैदानावर सभा घेणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे दोन्ही मैदाने कार्यकर्त्यांनी तुडूंब भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहेत.