शिवसेना दसरा मेळावा… शांत आहोत तो पर्यंत शांत राहू द्या…अन्यथा शिवतीर्थ हून उद्धव ठाकरेंचा इशारा.

मुंबई , दि.५ (प्रतिनिधी) शिवसेना फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर घणाघाती टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या सात जणांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यामध्ये मी त्यालाही मान दिला होता, असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण त्यांच्या बुडाखाली जरी मंत्रिपदाच्या खुर्च्या चिकटल्या असतील तर त्या एक दिवस निघून जातील. मात्र कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.

बाप चोरणारी औलाद म्हणत
उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, भाजपने पाठीत वार केला, मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक सोबत होते. अमित शाह बोलले की असं काही ठरलंच नव्हतं. पण शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यायचं असं ठरलं होतं. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही. शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरु आहे. याला आमदार केलं, मंत्री केलं, आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा यांची गद्दारी सुरुच. ही बाप चोरणारी औलाद आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत. त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोणी म्हणतोय चुन चुन के मारुंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते म्हणाले मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय कुत्री पाळायची का?

शांत आहोत, शांत राहू द्या, अन्यथा… असा इशारा देत ते पुढे म्हणाले, जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही. तुमचे भाजप सरकार हिंदुत्व करत गायीवर बोलता. महागाईवर बोला, तिकडे देश होरपळतोय. गॅस महागला, भाज्या महागल्या, डाळी महागल्या सांगायला गेलात तर म्हणणार जय श्रीराम, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

काळ बदलतो तसा रावण बदलतो
दरवर्षी परंपरेप्रमाणे मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. यावेळी रावण वेगळा आहे. काळ बदलतो, तसा रावण बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता, आता 50 खोक्यांचा रावण झालाय. हा 50 खोक्यांचा ‘खोकासूर’ आहे. शिवसेना ही एकट्या दुकट्याची नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक उठून बोलेन गेट आउट… मी असाच पायऱ्या उतरुन घरी निघून जाईन. माझी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा मी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, तेव्हा हा कटप्पा (एकनाथ शिंदे) कट करत होता. पण, त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे. आई जगदंबा माझ्या पाठीशी आहे.

आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील निशाणा साधला. अमित शाह म्हणाले की शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरलं नव्हतं. मात्र मी शिवरायांच्या साक्षीने, आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं हे ठरलं होतं. अडीच वर्ष भाजप- अडीच वर्ष शिवसेनेची हेच तेव्हा सांगत होतो. आता केलं, ते तेव्हा का नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरुन शिवसेना पळवतायत
जस रावणाने सन्याशाचं रुप घेऊन सीता हरण केलं होतं तसं हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरुन शिवसेना पाळवतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केली. मान सन्मान घेऊन मी अडीच वर्षे काम केलं, पण माझ्या कानात त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही सांगितलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत, सगळीकडे नुसता फोडाफोडी सुरु केली, असंही ते म्हणाले.

दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ असा घणाघात करीत सरकार बदलल्यानंतर राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत.
त्यावेळी हे मिंधे सरकार माना खाली घालून बसलेत. मान खाली झुकवली आणि ‘उठेगा नही साला’ असा प्रकार आहे.
दिल्लीत मुजरा अन् गल्लीत गोंधळ असा प्रकार मिंधे गटाचा आहे. त्यांच्या सरकारला आता 100 दिवस होणार आहेत.
पण त्यापैकी 90 दिवस हे दिल्लीत गेलेत, कुर्निसात करायला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

आता शिवसेना पक्षप्रमुख व्हायचे आहे
शिवसेना संपवायची, खतम करायची. माणसाची हाव किती असते बघा.
इतरांना बाजूला सारुन तुला तिकीट दिले, आमदार केले, मंत्रीपद दिले आता मुख्यमंत्री झाला,
तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचे आहे.
लायकी आहे का? आणि तुम्ही स्विकारणार का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत खरपूस समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page